उत्पादन घटल्याने शेतकरी, उद्योजक धास्तावले

सुनील कोंडुसकर
रविवार, 22 एप्रिल 2018

चंदगड : काजूच्या फुलोऱ्याच्या ऐन हंगामात सतत थंडी आणि धुक्‍यामुळे उत्पादन सुमारे पन्नास टक्केंनी घटले आहे. याचा फटका शेतकऱ्यांसह काजू प्रक्रिया उद्योजकांनाही बसला आहे. बी उशिरा बाजारपेठेत आणली की दर मिळतो या मानसिकतेमुळे स्थानिक माल बाजारपेठेत येत नसल्याने अजूनही आठवडा बाजारात काजूचा व्यापार थंडच आहे. प्रक्रिया उद्योजकांना अधिक दराने कोकणातून तसेच इंडोनिशिया येथून बी आयात करावी लागत आहेत. 

कोकण घाटमाथ्याला लागून असलेल्या आजरा, चंदगड, गडहिंग्लजचा पश्‍चिम भाग तसेच भुदरगड, राधानगरी तालुक्‍यात काजूचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. गेल्या काही वर्षात काजूवर प्रक्रिया करणारे उद्योगही मोठ्या प्रमाणात तयार झाले असून या कारखान्यातून हजारो महिलांना बारमाही रोजगार मिळाला आहे.

चंदगडसारख्या तालुक्‍यात लहान-मोठे मिळून पन्नासाहून अधिक प्रक्रिया उद्योग असून त्यांना वार्षिक सुमारे 15 हजार टन काजूची गरज लागते. तालुक्‍यात 7 हजार हेक्‍टरमधून सुमारे वीस टन बी चे उत्पादन होते. मात्र मे महिन्यातच ही बी बाजारपेठेत आणण्याबाबत शेतकऱ्यांची पारंपरिक मानसिकता व्यापारी, प्रक्रिया उद्योजकांना अडचणीची ठरत आहे.

या वर्षी मुळातच पन्नास टक्केहून अधिक उत्पादनात घट झाल्याचा परिणाम सध्या बाजारपेठेत दिसून येत आहे. आठवडा बाजारात बी खरेदीसाठी काटे लावून बसणाऱ्या व्यापाऱ्यांना मजुरी आणि वाहनाचे भाडे देण्याएवढेही पैसे मिळत नसल्याची स्थिती आहे. उत्पादनात घट असल्याने सध्या बी चा किलोचा दर 140 रुपयांवर पोचला आहे.

तो दीडशे रुपयांपर्यंत जाण्याची शक्‍यता आहे. परंतु उत्पादनात घट असल्याने शेतकऱ्यांना या वर्षी या पिकाकडून फारसा दिलासा मिळणार नाही हे स्पष्ट आहे. काजू कारखानदार आणि शेतकरी हे एकमेकांवर आधारित घटक आहेत. बी अभावी उद्योग बंद ठेवल्यास त्याचा फटका कारखानदार आणि मजुरांना बसतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी मानसिकता बदलून उपलब्ध माल ज्या-त्या वेळी बाजारपेठेत आणायला हवा, असे मत उद्योजक पांडुरंग काणेकर यांनी व्यक्त केले. 

उत्पादनात घट झाल्याचा परिणाम शेतकरी आणि उद्योजक दोघांनाही बसणार आहे. काजूवर आधारित हजारो लोकांना आर्थिक नुकसान सोसावे लागणार आहे. यासाठी शासनाने शेतकरी आणि कारखानदार दोघांनाही अनुदानाची तरतूद करायला हवी. 
- भास्कर कामत, उपाध्यक्ष महाराष्ट्र काजू प्रक्रिया उद्योग असोसिएशन 

Web Title: Cashew production decreased in Kokan