esakal | शेतकऱ्यांसमोर काजू विक्रीचे संकट; पंधराशे कोटींची उलाढाल थांबली
sakal

बोलून बातमी शोधा

शेतकऱ्यांसमोर काजू विक्रीचे संकट; पंधराशे कोटींच्या उलाढालीवर परिणाम

शेतकऱ्यांसमोर काजू विक्रीचे संकट; पंधराशे कोटींच्या उलाढालीवर परिणाम

sakal_logo
By
स्नेहल कदम

वैभववाडी (सिंधुदुर्ग) : आठवडा बाजार बंद झाल्यामुळे जिल्ह्यात काजू बीच्या खरेदी - विक्रीमध्ये खंड पडला आहे. अजुनही मोठ्या प्रमाणात काजू बी शेतकऱ्यांकडुन शिल्लक असल्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. त्यामुळे अगोदरच अवकाळी पाऊस, गारपीट, ढगाळ वातावरणाने ग्रासलेला जिल्ह्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांसमोर काजू विक्रीचे आणखी एक संकट उभे राहिले आहे.

जिल्ह्यात 60 ते 65 हजार क्षेत्र काजू उत्पादनक्षम काजू आहे. जिल्ह्यात काजुची उलाढाल बाराशे ते पंधराशे कोटीची आहे. साधारणपणे फेब्रुवारीपासुन काजू बीचा हंगाम सुरू होतो. मोठे बागायतदार वगळता बहुतांशी काजू उत्पादक शेतकरी तालुका किवा विभागनिहाय भरणाऱ्या आठवडाबाजारात काजू बीची विक्री करतात. काजू हंगाम सुरू झाल्यानंतर काजू बी खरेदी करणारे व्यापारी त्या त्या आठवडा बाजारात जाऊन काजू बी ची खरेदी करतात. अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना हे माहीत असल्यामुळे शेतकरी देखील दर आठवड्यात गोळा केलेल्या काजू बी ची विक्री आठवडा बाजारात जाऊन करतात; परंतु गेल्या काही दिवसांपासुन जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग प्रचंड वाढत आहे.

राज्यातही कोरोनाचे रूग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने 15 दिवसांपुर्वी गर्दीवर नियत्रंण आणण्यासाठी तालुका, विभागनिहाय भरणारे आठवडाबाजार बंद करण्याचा निर्णय घेतला. जिल्ह्यात 20 ते 25 ठिकाणी आठवडा बाजार भरतात. या आठवडा बाजारामध्ये काजू बी ची खरेदी - विक्री होते. फेब्रुवारी ते एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत काजू विक्रीतुन कोट्यावधीची उलाढाल होते; परंतु हे सर्व आठवडाबाजार बंद झाल्यामुळे काजू उत्पादक शेतकऱ्यांची आता कुचंबणा झाली आहे.

काही शेतकऱ्यांनी काजू बी चा दर वाढेल या शक्‍यतेने काजू बी ची अजिबात विक्री केलेली नाही. त्यामुळे हे शेतकरी आता हवालदिल झाले आहेत. सध्या काजू बीचा दर 105 ते 115 रूपये प्रतिकिलो आहे. त्यामुळे काजु बी दर कमी करण्यासाठभ आता व्यापाऱ्यांचे चांगलेच फावणार आहे. गेल्यावर्षी लॉकडाऊन काळातच काही व्यापाऱ्यांनी 120 रूपये दर असताना लॉकडाऊनचे कारण पुढे करीत 70 ते 80 रूपयेने काजु बी खरेदी केली होती. त्यामुळे असे प्रकार झाले तर आपले नुकसान होईल अशी भिती शेतकऱ्यांच्या मनात आहे.

"दोन एकरमध्ये काजू उत्पादनक्षम झाडे आहेत. यावर्षी उत्पादनाचे दुसरे वर्ष आहे. त्यामुळे सरासरी 400 ते 500 किलो काजू बी मिळेल, अशी अपेक्षा होती; परंतु यापुर्वी झालेल्या गारपीटीने मोठे नुकसान झाले; परंतु तरीही थोडाफार काजू आहे. त्याची विक्री अद्याप केली नाही. आठवडाबाजार बंद झाल्यामुळे आता विक्रीची अडचण होणार आहे."

- मंगेश गुरव, शेतकरी, खांबाळे