कॅशलेस व्यवहाराला गती

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 डिसेंबर 2016

महाड - नोटाबंदीच्या निर्णयानंतर आता कॅशलेस व्यवहारात वाढ होऊ लागली असून नागरिकांतही याबाबत जनजागृती होत आहे. महाडसह अन्य तालुक्‍यांमधील औषध दुकाने, शॉपिंग सेंटर, अगदी पुस्तक प्रदर्शन व विक्री, वडापाव दुकानापर्यंतही कॅशलेस व्यवहार सुरू झाले आहेत. अनेक व्यापाऱ्यांनीही स्वाईप मशीनचा मार्ग निवडला आहे.

महाड - नोटाबंदीच्या निर्णयानंतर आता कॅशलेस व्यवहारात वाढ होऊ लागली असून नागरिकांतही याबाबत जनजागृती होत आहे. महाडसह अन्य तालुक्‍यांमधील औषध दुकाने, शॉपिंग सेंटर, अगदी पुस्तक प्रदर्शन व विक्री, वडापाव दुकानापर्यंतही कॅशलेस व्यवहार सुरू झाले आहेत. अनेक व्यापाऱ्यांनीही स्वाईप मशीनचा मार्ग निवडला आहे.

केंद्र सरकारने हजार व पाचशे रुपयांच्या नोटा मागील महिन्यात चलनातून बंद केल्यानंतर लहान-मोठ्या क्षेत्रांनाही आर्थिक व्यवहाराचा फटका बसला होता. सरकारकडूनही गावे कॅशलेस करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जात आहेत; परंतु बदलत्या परिस्थितीनुसार नागरिकही स्वतःच आता कॅशलेस व्यवहार करण्याचा प्रयत्न करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून बॅंकांमध्येही ऑनलाईन व्यवहारासंबंधी माहिती घेणाऱ्या ग्राहकांची संख्या वाढली आहे. तसेच पेटीएम व विविध बिले भरण्यासंबंधीची ऍपही डाऊनलोड करण्याचे प्रमाण वाढले आहे.

महाड शहरातील चवदार तळे येथे सुयश पुस्तक प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या ठिकाणी पुस्तक खरेदीसाठी पेटीएम व ऑनलाईन पेमेंटचे पर्याय ग्राहकांना देण्यात आले आहेत. त्यामुळे मागील वर्षीपर्यंत या प्रदर्शनात रोखीने व्यवहार करणारे अनेक ग्राहक आता कॅशलेस मार्ग स्वीकारत आहेत. महाडमधील अनेक औषध दुकानांमध्येही पेटीएमद्वारे बिलाची रक्कम स्वीकारली जाताना दिसत आहे. यासंबंधीचे बारकोडही दुकानाबाहेर लागले आहेत. शहरातील आपला बाजार, राडाजी शॉपिंग, हॉटेल समृद्धी; तसेच अन्य हॉटेल्स व शॉपिंग सेंटरमध्येही स्वाईप मशीनने पेमेंट स्वीकारले जात आहेत.

पोलादपूर येथील एका वडापावच्या टपरीवरही चक्क कॅशलेस व्यवहार सुरू झाले आहेत. पेट्रोलपंपालगत असलेल्या मुजावर बंधूंच्या वडापाव सेंटरवर "कॅशलेस' वडापाव विक्रीचा प्रयत्न नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून सुरू झाला आहे. मुश्‍ताक मुजावर याने "पे-टीएम' ऍप मोबाईलवर डाऊनलोड करून कॅशलेस व्यवहाराचा अवलंबही केला. बारकोडचा चौकोन प्रिंट करून वडापाव सेंटरच्या दर्शनी भागात पाटीवर चिकटवला आहे.

महाड तसेच इतर तालुक्‍यातील व्यापाऱ्यांनीही बॅंकांकडे स्वाईप मशीनची मागणी केली आहे. महावितरण, टेलिफोन बिले, एसटी व रेल्वे तिकिटे यावरही ग्राहकांनी ऑनलाईनवर भर दिल्याचे दिसत आहे.

Web Title: Cashless transaction speed