रिक्षा स्टॅंड ओस; ‘चक्का जाम’ यशस्वी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 फेब्रुवारी 2017

शुल्कवाढीविरोधात आंदोलन - नागरिकांची पायपीट, विद्यार्थी-महिलांची गैरसोय; एसटीचा आधार 

रत्नागिरी - रत्नागिरीत रिक्षा संघटनेचा चक्का जाम शंभर टक्के यशस्वी झाला. सर्व रिक्षा संघटना यामध्ये सामील झाल्याने शहर आणि परिसरातील रिक्षा स्टॅंड ओस पडली होती. शहरांतर्गत वाहतूक व्यवस्था विस्कळित झाली होती. शाळकरी मुले, बाजारहाटासाठी जाणाऱ्यांची मोठी गैरसोय झाली. अनेकांना एसटीचा आधार घ्यावा लागला. 

शुल्कवाढीविरोधात आंदोलन - नागरिकांची पायपीट, विद्यार्थी-महिलांची गैरसोय; एसटीचा आधार 

रत्नागिरी - रत्नागिरीत रिक्षा संघटनेचा चक्का जाम शंभर टक्के यशस्वी झाला. सर्व रिक्षा संघटना यामध्ये सामील झाल्याने शहर आणि परिसरातील रिक्षा स्टॅंड ओस पडली होती. शहरांतर्गत वाहतूक व्यवस्था विस्कळित झाली होती. शाळकरी मुले, बाजारहाटासाठी जाणाऱ्यांची मोठी गैरसोय झाली. अनेकांना एसटीचा आधार घ्यावा लागला. 

दरम्यान, रिक्षाधारकांच्या समस्या शासनापर्यंत पोचाव्यात, यासाठी चार रिक्षा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी निवासी जिल्हाधिकारी सारंग कोडोलकर यांना निवेदन सादर केले. यावेळी संघटनांचे पदाधिकारी अविनाश कदम, प्रताप भाटकर, सलीम जमादार, रवींद्र शिवलकर, सेना संघटनेचे प्रमोद शेरे, राजेश सावंत आदी उपस्थित होते. 

शासनाने रिक्षाच्या विविध वाहन शुल्कात वाढ केल्यामुळे येथील रत्नागिरी जिल्हा शिवसेनाप्रणीत रिक्षा-टॅक्‍सी व शिवसंस्कार विद्यार्थी वाहतूक सेना, रत्नदुर्ग रिक्षा व्यावसायिक संघटना, आदर्श ऑटो व चालक-मालक व आदर्श वाहतूक संघ, स्वाभिमान रिक्षा संघटना आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. चक्का जाममुळे सकाळी सहा वाजल्यापासून प्रवाशांची तारांबळ उडाली होती. शहरातील जिल्हा शासकीय रुग्णालय, एसटी स्थानक, तसेच टपाल प्रधान कार्यालय समोरील रिक्षा स्टँड, लक्ष्मी चौक, मारुती मंदिर येथे निषेधाचे फलक लावले होते. रिक्षा नसल्यामुळे प्रवाशांना बस स्थानकापर्यंत तसेच शहरात पायपीट करावी लागली. 

केंद्र शासनाने केंद्रीय मोटर वाहन नियम १९८९ मधील शुल्काबाबत २९ जानेवारीपासून अचानक शुल्कात वाढ केल्यामुळे रिक्षा व्यावसायिकांवर भुर्दंड पडतो आहे. वाहनाची विमा रक्कमही वाढली. शासनाने छोट्या शहरातील वाहनधारकांचा विचार करणे अपेक्षित होते. अचानक शुल्कात वाढ झाल्यामुळे येथील रिक्षाचालकांचा जीव मेटाकुटीस आला. वाढीव शुल्क व दंड कमी करण्यासाठी महाराष्ट्रभर चक्का जाम आंदोलन करण्यात आले.

दिलगिरी आधीच व्यक्त
चक्का जाम आंदोलनामध्ये सर्व रिक्षा संघटना सामील होणार असल्याने नागरिकांची गैरसोय होणार याची कल्पना संघटनांना होती. त्यामुळे त्यांना कालच शहरामध्ये ध्वनिक्षेपकाद्वारे पूर्वकल्पना देऊन दिलगिरी व्यक्त केली होती; मात्र या आंदोलनामुळे आज शाळकरी मुले, कामासाठी बाहेर पडणारे नागरिक आदींची गैरसोय झाली. त्यांना एसटीशिवाय पर्याय उरला नव्हता.

शुल्कात कपात करून दिलासा द्या
केंद्र शासनाने केंद्रीय मोटर वाहन नियम १९८९ मधील शुल्कामध्ये २९ जानेवारीपासून केलेली वाढ थांबवावी व छोट्या शहरातील रिक्षा व्यावसायिकांना आर्थिक भुर्दंड पडणार नाही, असे निर्णय घ्यावेत, शुल्कात झालेली वाढ थांबवून रिक्षाचालकांना दिलासा द्यावा अशी अपेक्षा रत्नदुर्ग रिक्षा व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष प्रताप भाटकर यांनी व्यक्त केली.

Web Title: chakk jam success in ratnagiri