मे २०१९ पर्यंत इंदापूर ते झारापपर्यंत चौपदरीकरण - चंद्रकांत पाटील

मे २०१९ पर्यंत इंदापूर ते झारापपर्यंत चौपदरीकरण - चंद्रकांत पाटील

कणकवली - महामार्ग चौपदरीकरणात शहरातील हायवे बाधितांच्या मालमत्तांचे फेर सर्व्हेक्षण करून वाढीव मूल्यांकन दिले जाईल; मात्र दुप्पट गुणांक दिला जाणार नाही. कोणत्याही परिस्थितीत मे २०१९ पर्यंत इंदापूर ते झारापपर्यंत चौपदरीकरण पूर्ण होईल. त्यासाठी दर महिन्यात कोकण दौऱ्यावर येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे दिली.

श्री. पाटील यांनी चिपळूणपासून मुंबई-गोवा महामार्ग पाहणी दौरा सुरू केला. यात कासार्डे येथे भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांच्या निवासस्थानी भोजन आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यानंतर कणकवली शासकीय विश्रामगृहात त्यांनी पत्रकार परिषद घेतली. पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, प्रमोद जठार, राजन तेली, अतुल काळसेकर उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले, ‘‘महामार्ग चौपदरीकरणातील भू संपादनाचे बहुतांश प्रश्‍न आम्ही मार्गी लावले आहेत. 

कुडाळ येथे उड्डाणपुलाला मंजूरी मिळावी, यासाठी उद्या (ता. ९) दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार आहोत. यात भाडेधारकांना मोबदला देता येईल का, याबाबतही चर्चा करणार आहे. कणकवलीत ज्या मालमत्ता धारकांच्या मोबदल्याबाबत हरकती आहेत, त्यांचे फेरसर्व्हेक्षण करून नव्याने मूल्यांकन करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. यंदाच्या गणेशोत्सवात मुंबई- गोवा महामार्ग खड्डे मुक्‍त असणार आहे.’’ 

राज्यमार्गावरील खड्डे बुजवण्याच्या सूचना
राज्यमार्गाचे खड्डे बुजविण्यासाठी संबंधित विभागाला मदत करा, अशा सूचना देत दिलीप बिल्डकॉन कंपनीचे काम चांगले असल्याची शिफारस  मंत्री पाटील यांनी कंपनी अधिकाऱ्यांना दिली. लोकांची मागणी लक्षात घेता लवकरात लवकर काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा त्यासाठी ठेकेदारांना आम्ही  बोनस देण्याचा निर्णय घेतला असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेनंतर श्री. पाटील यांनी महामार्ग तसेच बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. बिल्डकॉन कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तुमचे काम चांगले आहे. आता त्यात एक आणखी काम करता जे अंतर्गत राज्यमार्ग आहेत ते खड्डेमय आहेत. त्यामुळे ते खड्डे बुजविण्यासाठी प्रयत्न करा, अशा त्यांना सूचना केल्या.

पुलांसाठी नव्याने निविदा
महामार्गावरील नवीन पुलांची बांधकामे ९० टक्‍केपर्यंत पूर्ण झाली. मात्र हे काम करणारी कंपनी दिवाळखोरीत गेली. त्यामुळे ऑक्‍टोबरमध्ये या रखडलेल्या पुलांसाठी नव्याने निविदा मागविणार आहोत, असे श्री. पाटील म्हणाले.

चिपीचा निर्णय दिल्लीत
चिपी विमानतळ खासगी आहे. तेथे विमान उतरण्यासाठी अद्याप राज्य शासनाकडून परवानगी मिळालेली नाही. त्याबाबत केंद्रीयमंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दिल्लीत चर्चा करणार आहोत. चर्चेनंतर १० सप्टेंबरला चाचणीसाठी विमान उतरेल की नाही, याची निश्‍चिती होईल, असे पालकमंत्री दीपक केसरकर या वेळी म्हणाले.

राणेंची समजूत काढली
शहरातील प्रकल्पग्रस्तांसाठी आमदार नीतेश राणे यांनी कणकवली शहरातील चौपदरीकरण कामाला विरोध केला होता. मात्र त्यांची समजूत आम्ही काढली आहे. त्यामुळे लवकरच काम सुरू होईल, असे श्री. पाटील म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com