शेतकऱ्यांचे खावटी कर्ज माफ करणार - चंद्रकांत पाटील

शेतकऱ्यांचे खावटी कर्ज माफ करणार - चंद्रकांत पाटील

कणकवली - सिंधुदुर्गासह राज्यातील खावटी कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफी दिली जाणार आहे. यात सिंधुदुर्गातील 9 हजार शेतकऱ्यांचे 13.50 कोटी रुपये लवकरच माफ होतील, अशी ग्वाही महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

मुंबई गोवा महामार्ग पाहणी दौऱ्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. खावटी कर्ज माफीसाठी प्रदेश कार्यकारीणी सदस्य अतुल काळसेकर यांनी सतत पाठपुरावा केल्याचेही ते म्हणाले.

राज्यात 352 कोटीचे खावटी कर्ज देण्यात आले आहे. विशेषतः आदिवासी भागातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी हे कर्ज 20 हजाराच्या मर्यादेत दिले जाते. सिंधुदुर्गात असे साडेतेरा कोटीचे कर्ज देण्यात आले आहे. या कर्जमाफीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली असून या खावटी कर्जधारकांचाही कर्जमाफीमध्ये समावेश करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांनी मान्य करून तसे निर्देश सहकार विभागाला दिले आहेत. याचा लाभ जिल्ह्यातील साडेनऊ हजार शेतकऱ्यांना होणार आहे असे श्री.पाटील म्हणाले.

खावटी कर्ज माफीसाठी जिल्हा बॅंकेचे संचालक अतुल काळसेकर यांनी सतत पाठपुरावा केला होता. तसेच अलीकडेच खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सतीश सावंत आणि बॅंकेच्या संचालकांनी खावटी कर्जमाफीसह अनेक मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. मुख्यमंत्र्यांनी त्यांना सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही दिली होती. 

हायब्रीड ऍन्युईटीला पर्याय काढणार

राज्यात हायब्रीड ऍन्युइटी अंतर्गत रस्त्यांच्या कामांसाठी 137 टेंडर्स काढण्यात आली आहेत, त्यापैकी 94 ठिकाणी वर्कऑर्डर देण्यात आली असून 26 ठिकाणी कामेही सुरू झाली आहे. मात्र कोकणात हायब्रीड ऍन्युइटी अंतर्गत टेंडर्सला प्रतिसाद मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे येत्या आठ दिवसांत याबाबत मार्ग न निघाल्यास वेगळा पर्याय काढून रस्त्यांची कामे केली जातील. मात्र जोपर्यंत ठेकेदार निश्‍चित होऊन करार होत नाहीत तोपर्यंत रस्त्यांची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळता येणार नाही असेही श्री.पाटील म्हणाले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com