लॉटरीच्या नावे तरुणाला अडीच लाखांना लुबाडले

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

कणकवली - "पाच लाखांची लॉटरी लागली,' असे सांगून नांदगावच्या तरुणाकडून प्रोसेसिंग फी, रजिस्ट्रेशन फी आदींसाठी टप्पाटप्प्याने दोन लाख 54 हजार रुपये उकळण्यात आले. आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच त्या तरुणाने येथील पोलिस ठाण्यात आज तक्रार दिली.

कणकवली - "पाच लाखांची लॉटरी लागली,' असे सांगून नांदगावच्या तरुणाकडून प्रोसेसिंग फी, रजिस्ट्रेशन फी आदींसाठी टप्पाटप्प्याने दोन लाख 54 हजार रुपये उकळण्यात आले. आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच त्या तरुणाने येथील पोलिस ठाण्यात आज तक्रार दिली.

तालुक्‍यातील नांदगाव येथील प्रदीप दिनकर सावंत (वय 32) गोवा येथील औषध कंपनीमध्ये कामाला आहेत. त्यांच्या मोबाईलवर 27 जुलैला पाच लाखांची लॉटरी जिंकल्याचा मेसेज आला. त्यापाठोपाठ त्या लॉटरी कंपनीकडून फोनदेखील आला. त्यानुसार सावंत यांनी आपला मेल आयडी आणि पत्ता त्या कंपनीकडे पाठवला. त्यानंतर पुन्हा एकदा फोन करून "पाच लाखांची लॉटरी तुम्ही जिंकला आहात, त्यासाठी 25 हजार रुपये प्रोसेसिंग फी भरा,' असे लॉटरी कंपनीकडून सांगण्यात आले.

त्यानुसार सावंत यांनी चार ऑगस्टला 25 हजार रुपये सांगितलेल्या बॅंक खात्यात भरले. यानंतर त्यांना लॉटरीची वेबसाइट देण्यात आली. या वेबसाइटवर लॉग-इन करण्यासाठी यूजर आयडी आणि पासवर्ड मिळविण्यासाठी 98 हजार 999 रुपये भरण्यास सांगण्यात आले.

त्यानुसार सावंत यांनी सहा ऑगस्टला तेवढी रक्‍कम भरली. पुन्हा इन्कम टॅक्‍स कोडसाठी सात ऑगस्टला त्यांनी एक लाख 30 हजार रुपये भरले. यानंतर पुन्हा दहशतवादी नसल्याचे सर्टिफिकेट मिळविण्यासाठी 50 हजार रुपये भरा, असा आग्रह त्या लॉटरी कंपनीकडून केला जात होता. त्यामुळे या प्रकरणात आपली फसवणूक होत असल्याचे प्रदीप सावंत यांच्या लक्षात आले. त्यानुसार त्यांनी आज येथील पोलिस ठाण्यात आपली फसवणूक झाल्याची तक्रार नोंदवली आहे.

Web Title: Cheating loot crime police