Chhath Puja 2021 : हर्णे बीचवर छट पूजा उत्साहात साजरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chhath Puja 2021

Chhath Puja 2021 : हर्णे बीचवर छट पूजा उत्साहात साजरी

sakal_logo
By
राधेश लिंगायत

हर्णे : बहुसंख्य उत्तरभारतीयांच्या उपस्थितीत हर्णे बीचवर छटपूजेचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. छटपूजेचा उत्सव चार दिवसांपूर्वीच सुरू होतो. यावर्षी सोमवार (ता.८) चतुर्थीच्या दिवसापासून उत्तरप्रदेशमध्ये छटपूजेचा उत्सव सुरू झाला होता. यामध्ये दोन दिवस अगोदर महिलावर्ग उपवास धरतात आणि पुढील दोन दिवस म्हणजे षष्ठी आणि सप्तमीच्या दिवशी समुद्र किंवा नदीकिनारी जाऊन हा उत्सव साजरा केला जातो. षष्ठीचा दिवस आणि त्यादिवशी धरला जाणारा उपवास महत्वाचा मानला जातो.

हेही वाचा: T20 WC : पाकचं काही खरं नाही, झुंजारु गडी सेमी फायनलला मुकणार?

उत्तरप्रदेशवासिय महिला संपुर्ण चार दिवस उपवास करतात. षष्ठीला पूर्ण निर्जळ उपवास पकडला जातो. सायंकाळी सूर्यास्ताच्या अगोदरच छटमाईची नदी किंवा समुद्रकिनारी पूजा मांडून तिथे विधिवत पूजा केली जाते. या मांडणीमध्ये उसाला महत्व दिल जात. चारही बाजूने ऊस पुळणीत रोवून उसाचा मांडव करून त्यामध्ये पाण्याने भरलेला कलश ठेऊन त्यावर दिवा पेटवला जातो. आणि किनाऱ्यावर वाळूचा डुंग करून त्यावर या पूजेची मांडणी करतात. आणि त्यासमोर खवा, गव्हाचं पीठ आणि तुपापासून बनवलेला प्रसाद आणि फळं यांचा नैवेद्य दाखवतात आणि गाईच्या दुधाचे सूर्याला अर्घ्य दिल जात या उत्सवामध्ये छटमाई प्रमाणे सूर्याची पूजा देखील महत्वाची मानली जाते.

त्याप्रमाणे हर्णे येथील बीचवर याप्रकारच्या पूजेची काल सायंकाळी ४ च्या सुमारास मांडणी केली होती. याठिकाणी सूर्याचा अस्त होताना महिलांनी अर्घ्य दिले. आणि दुसऱ्या दिवशी पहाटे म्हणजे सप्तमीच्या दिवशी पुन्हा ४ वाजण्याच्या सुमारास पुन्हा त्याच पद्धतीची पूजा मांडणी करण्यात आली आणि सूर्योदय होताना सूर्याला अर्घ्य दिले आणि नंतर या महिलांनी उपवास सोडला अश्या तऱ्हेने हर्णे येथे मोठ्या उत्साहात बहुसंख्य उत्तरप्रदेशवासियांच्या उपस्थितीने छटपूजेचा उत्सव साजरा करण्यात आला. याठिकाणी दापोली तालुक्यातून ज्या ज्या ठिकाणी कामाकरिता म्हणून हे उत्तरप्रदेशवासिय आलेले असतात ते सर्व हर्णेमध्ये हा सण साजरा करण्यासाठी येतात.

हेही वाचा: "EDने वक्फ बोर्डाच्या 30 हजार संस्थांची चौकशी करावी"

गेल्या २० ते २५ वर्षांपासून आम्ही याठिकाणी छटपूजेचा उत्सव करत आहोत येथील स्थानिकांचा देखील या उत्सवामध्ये आम्हाला चांगले सहकार्य लाभते. चार दिवसांचा हा उत्सव असतो आज षष्ठीला सूर्यास्ताच्या वेळेस सूर्याला अर्घ्य दिले जाते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योदयाच्या वेळेस अर्घ्य दिले जाते. संपूर्ण दापोली तालुक्यातून आमचे उत्तरप्रदेशवासिय हा उत्सव साजरा करण्याकरीता येथे हर्णे बंदरात येतात, असे हर्णे येथे स्थायिक झालेले उत्तरप्रदेशचे रहिवाशी श्री. प्यारेलाल वर्मा यांनी सांगितले.

loading image
go to top