जगभर चिनचा विरोध; पण गणेशोत्सवात `चायना मेड`चा मोह

तुषार सावंत
Saturday, 22 August 2020

यामुळे भारतीय नागरिक संतप्त झाले होते. चारबंदीच्या कालावधीमध्ये अनेकांनी हा संताप सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्तही केला होता.

कणकवली (सिंधुदुर्ग) - भारतीय बाजारपेठेत चिनी वस्तूंनी हातपाय पसरायला सुरुवात केल्यानंतर "मेड इन चायना'वर बहिष्कार घालण्यात आला. काही राजकीय पक्षांनी चिनी बनावटीच्या वस्तूंची होळीही केली; पण गणेशोत्सवासारख्या मोठ्या सणाच्या तोंडावर "मेड इन चायना'चा मोह भारतीय नागरिकांना काही आवरता आला नसल्याचे चित्र बाजारपेठेत पहायला मिळाले. 

वाचा - अनाथांच्या नाथा तुज नमो  ; देवरुखात या दहा मुली साजरा करणार दिड दिवसांचा गणेशोत्सव 

गलवान सीमेवरील भारतीय सैनिक शहीद झाल्याच्या घटनेनंतर भारत- चीन या दोन देशांमधील तणाव वाढलेला आहे. कोरोना संसर्गजन्य आजार हा चीनच्या वुहान शहरांमधून जगभरात पसरला. यामुळे संपूर्ण देशात आणि जगातही चीन विरोधात लाट उभी होती. यामुळे भारतीय नागरिक संतप्त झाले होते. चारबंदीच्या कालावधीमध्ये अनेकांनी हा संताप सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्तही केला होता.

यापुढे चिनी बनावटीच्या वस्तू वापरणार नाहीत. अशा आणाभाका घेतल्या होत्या; पण भारतीय बाजारपेठेत दाखल झालेल्या चिनी बनावटीच्या वस्तू या ग्राहकांच्या पसंतीला उतरत आहेत. विशेष म्हणजे हिंदूंच्या सगळ्याच सणासाठी लागणाऱ्या वस्तू या चीन देशातून आयात केल्या जातात. सामान्य ग्राहकांना परवडणाऱ्या या वस्तू ग्रामीण भागातील बाजारपेठ पर्यंत केव्हाच पोहचल्या आहेत. चीनच्या विरोधात कितीही टाहो फोडला तरी ग्राहकांच्या पसंतीला आणि मागणीला व्यावसायिकांचा पुरवठाही सुरू झाला आहे.

हेही वाचा - गणेशोत्सवामुळे बाजारपेठेत चैतन्य़़; पण सोशल डिस्टन्सचे तीन तेरा... कुठल्या जिल्ह्यात घडतयं! 

सध्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेचा आढावा घेतला तर इलेक्‍ट्रॉनिक वस्तू मोठ्या प्रमाणात दाखल झालेल्या आहेत. यात मोबाईल आणि साऊंड सिस्टमचा भरणा अधिक आहे. इलेक्‍ट्रिकमध्ये विविध प्रकारचे बल्ब असो किंवा विविध रंगांच्या विजेच्या तोरण माळेला मागणी आहे. याचबरोबर शोभेच्या वस्तूही दाखल झाल्या आहेत. सर्वसामान्य ग्राहकांना परवडणाऱ्या भावात या वस्तू उपलब्ध होत असल्याने निश्‍चितच मागणीही कायम आहे. त्यामुळे भारतीय बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या वस्तूला आजही ही चिनी बनावटीच्या वस्तू प्रतिस्पर्धी ठरत असल्याचे चित्र या निमित्ताने पुन्हा एकदा तिव्र विरोधानंतरही पुढे आले आहे. 

कौशल्य विकासाची गरज 
केंद्र सरकारने तरूणांना कौशल्य विकास कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रशिक्षित केले; पण आवश्‍यक भांडवल तरूणांकडे नसल्याने छोटे उद्योग उभे राहिले नाहीत. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी भारतीय नागरिकांना आत्मर्निभरतेचा नारा दिला; पण सरकारच्या या घोषणा केवळ कागदावरच्या आहेत. सामान्य कुंटूंबातील तरूण बेरोजगार होत असून त्यांच्या हाताला काम नाही. व्यवासाय करण्यासाठी पाठबळ नाही. त्यामुळे तरूणांना केवळ कौशल्य विकासाचे गाजर दाखवून आत्मर्निभर कसे होणार? हा प्रश्‍न आहे. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: china made literature konkan sindhudurg