बाळ मानेंच्या मार्गात विरोधी गटाचा अडसर

संदेश सप्रे
सोमवार, 24 डिसेंबर 2018

देवरूख - भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळ मानेंनी आपणाला चिपळूण विधानसभा मतदारसंघातून पक्षाने काम सुरू करण्याचे आदेश दिल्याचे वक्‍तव्य केल्याने या मतदारसंघातील इतर इच्छुकांचे धाबे दणाणले आहेत. खुद्द जिल्हाध्यक्षच उमेदवारीविषयी बोलत असल्याने आता माने विरोधी गट यावर कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 

देवरूख - भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळ मानेंनी आपणाला चिपळूण विधानसभा मतदारसंघातून पक्षाने काम सुरू करण्याचे आदेश दिल्याचे वक्‍तव्य केल्याने या मतदारसंघातील इतर इच्छुकांचे धाबे दणाणले आहेत. खुद्द जिल्हाध्यक्षच उमेदवारीविषयी बोलत असल्याने आता माने विरोधी गट यावर कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 

चिपळूण-संगमेश्‍वर मतदारसंघातून आपण इच्छुक असल्याचे जिल्हाध्यक्ष बाळ मानेंनी दीड वर्षापूर्वीच जाहीर केले आहे. त्यानुसार त्यांची तयारीही सुरू आहे. स्वतःचा वाढदिवस चिपळुणात साजरा करीत त्यांनी एक पाऊल पुढे टाकले होते. त्यानंतर तुषार खेतल हे इच्छुक म्हणून पुढे आले. आपल्याला वरिष्ठांनी काम सुरू करण्यास सांगितल्याचे जाहीर करीत गेले. काही महिने ते मतदारसंघात फिरत आहेत.

चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात भाजपची ताकद मोठी आहे. हा मतदारसंघ जिंकण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. पक्ष जो अधिकृत उमेदवार देईल, त्याचे काम करण्यास आम्ही बांधील आहोत. तोपर्यंत उमेदवार म्हणून पक्षाचे चिन्ह घरोघरी पोचवण्यावर आमचा भर आहे.
- प्रमोद अधटराव,
तालुकाध्यक्ष भाजप

भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सूर्यकांत साळुंखे यांनीही आपण इथून इच्छुक असल्याचे जाहीर केले आहे. सामाजिक कार्यकर्ते गणेश चाचे यांनीही इथून भाजपतर्फे लढण्याची तयारी सुरू केली आहे. या सर्व घडामोडीत बाळ मानेंचे नाव मागे पडले होते. मात्र शुक्रवारी (ता. २२) रत्नागिरीत त्यांनीच याचा पुनरुच्चार केल्याने आता चिपळूण मतदारसंघातील भाजपचा उमेवार नक्‍की कोण, याबाबत संभ्रम वाढला आहे. 

मानेंच्या कार्यपद्धतीवर भाजपमधील एक गट नाराज आहे. काही कारणांचे भांडवल करीत या गटातर्फे माने हटाओ मोहीम सुरू आहे. मात्र, मानेंचे थेट मुख्यमंत्र्यांशी सलोख्याचे संबंध असल्याने ते विरोधी गटाला पुरून उरले आहेत. या सगळ्या वातावरणात रत्नागिरी सोडून त्यांनी चिपळुणात येण्याचे जाहीर केल्याने आता हा मानेंविरोधी गट कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

Web Title: Chiplun assembly constituency special story