सर्वेक्षण झाले, आता निकालाची प्रतीक्षा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 जानेवारी 2018

चिपळूण - स्वच्छ सर्वेक्षणात सहभागी झालेल्या चिपळूण पालिकेची सर्वेक्षणाच्या रूपाने परीक्षा झाली. पालिकेने केलेल्या तयारीची सरकारी समितीने तपासणी केली. आता सर्वांना निकालाची प्रतीक्षा आहे. कोकणात प्रथम चिपळूण पालिकेचे सर्वेक्षण झाले. त्यामुळे चिपळूण पालिकेचा आदर्श घेऊन कोकणातील इतर पालिकांनी तयारी सुरू केली आहे.

चिपळूण - स्वच्छ सर्वेक्षणात सहभागी झालेल्या चिपळूण पालिकेची सर्वेक्षणाच्या रूपाने परीक्षा झाली. पालिकेने केलेल्या तयारीची सरकारी समितीने तपासणी केली. आता सर्वांना निकालाची प्रतीक्षा आहे. कोकणात प्रथम चिपळूण पालिकेचे सर्वेक्षण झाले. त्यामुळे चिपळूण पालिकेचा आदर्श घेऊन कोकणातील इतर पालिकांनी तयारी सुरू केली आहे.

स्वच्छ भारत अभियानामध्ये सहभाग नोंदविल्यानंतर चिपळूण पालिकेत गेली दोन महिने स्वच्छतेविषयी लगबग सुरू होती. पालिकेतील दप्तर तपासणीसाठी सज्ज करण्यात आले. शहरातील सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती करण्यात आली. शौचालय बांधण्यासाठी पालिकेकडून नागरिकांना अनुदान देण्यात आले. सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करून रंगरंगोटी करण्यात आली. पालिकेच्या इमारतही सजविण्यात आली. कचऱ्याचे वर्गीकरण करण्याबाबत नागरिकांमध्ये जागृती करण्यात आली.

कचऱ्यापासून खत निर्मितीला पालिकेने पुढाकार घेतला. दोन महिन्यांत झालेल्या एकूण कामाचा आढावा शासनाच्या समितीने घेऊन त्याचा अहवाल शासनाला ऑनलाईन पद्धतीने सादर केला.

विशेष म्हणजे स्वच्छ सर्वेक्षणाची पाहणी करण्यासाठी सरकारची समिती प्रथम चिपळुणात दाखल झाली. चिपळूणची पाहणी झाल्यानंतर समितीने कोकणातील इतर पालिका व नगरपंचायतीचे सर्वेक्षण हाती घेतले.

चिपळूणचे सर्वेक्षण सर्वात प्रथम झाल्यामुळे कोकणातील इतर पालिका व नगरपंचायतींमधून चिपळूण पालिकेत फोन येऊ लागले आहेत. समितीच्या पाहणीचे निकष काय आहेत, कशाप्रकारे सर्वेक्षण झाले, समितीला अपेक्षित काय आहे, याची माहिती घेऊन इतर पालिका व नगरपंचायती तयारीला लागल्या आहेत. त्यामध्ये कोण बाजी मारेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

रत्नागिरीशी चुरस
जिल्ह्यात ‘ब’ वर्ग पालिकांमध्ये चिपळूण व रत्नागिरी, तसेच ‘क’ वर्ग पालिकांमध्ये खेड व राजापूर पालिकेत चुरस राहील. शिवाय दापोली, गुहागर, मंडणगड, देवरूख आणि लांजा नगरपंचायतींमध्ये क्रमांकासाठी चुरस राहील. 

चिपळूण शहर स्वच्छ आहे. व्यापारी तसेच नागरिकांनी स्वच्छता मोहिमेला आपलेसे करीत चांगला प्रतिसाद दिलेला आहे. त्यामुळे चिपळूणला क्रमांक मिळण्याची संधी आहे. चिपळूण पालिकेचा आदर्श घेऊन इतर पालिका स्वच्छतेची तयारी करत आहेत. पालिका प्रशासन व सत्ताधारी यांच्यासाठी ही अभिमानाची बाब आहे. 
- आशीष खातू, नगरसेवक- भाजप

शहरातील नागरिकांनी स्वच्छता ॲप डाऊनलोड करून त्याचा वापर केला पाहिजे. तसेच स्वच्छतेमध्ये सातत्य राखले पाहिजे. 
- अनंत मोरे, प्रशासकीय अधिकारी

Web Title: chiplun konkan news cleaning survey result