भाजपमध्ये रमेश कदमांचे पुनर्वसन रखडले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 जून 2017

कार्यकर्ते अस्वस्थ - ‘ना घर का, ना घाट का’ अशी अवस्था
चिपळूण - राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करून भाजपमध्ये गेलेले चिपळूणचे माजी आमदार रमेश कदम यांचे पक्षात अद्याप पुनर्वसन झालेले नाही. त्यामुळे रमेश कदम समर्थक कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. राष्ट्रवादीत थांबायचे तर हा पक्ष सत्तेत नाही, रमेश कदमांबरोबर जायचे, तर सत्ताधारी पक्षात कोणी विचारत नाही, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे.

कार्यकर्ते अस्वस्थ - ‘ना घर का, ना घाट का’ अशी अवस्था
चिपळूण - राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करून भाजपमध्ये गेलेले चिपळूणचे माजी आमदार रमेश कदम यांचे पक्षात अद्याप पुनर्वसन झालेले नाही. त्यामुळे रमेश कदम समर्थक कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. राष्ट्रवादीत थांबायचे तर हा पक्ष सत्तेत नाही, रमेश कदमांबरोबर जायचे, तर सत्ताधारी पक्षात कोणी विचारत नाही, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे.

पालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवडण्याचे अधिकार रमेश कदमांना मिळाले; मात्र ४० वर्षे पालिकेवर असलेले कदमांचे वर्चस्व या वेळी संपुष्टात आले. शिवसेनेचे ११ नगरसेवक निवडून आल्यामुळे या पक्षाने पालिकेत मोठा गट तयार केला; मात्र नगराध्यक्ष भाजपचा निवडून आला.

शिवसेनेला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला जवळ केले. दोन्ही काँग्रेसने भाजपला शहराच्या विकासासाठी पाठिंबा दिला. याच दरम्यान रमेश कदमांनी राष्ट्रवादीतील सर्व पदांचा त्याग करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. मुंबईत झालेल्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमासाठी चिपळूण शहर आणि ग्रामीण भागातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी गेले होते. पक्षप्रवेशानंतर कोणत्याच हालचाली होत नसल्यामुळे काहीजण पुन्हा राष्ट्रवादीत, तर काहीजण शिवसेनेत सक्रिय झाले आहेत. 

चिपळूण विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेचे वर्चस्व आहे; मात्र या मतदारसंघात कदमांची वैयक्तिक राजकीय ताकद आहे. शिवसेनेला रोखण्यासाठी भाजप रमेश कदमांना मोठी जबाबदारी देऊन पक्षबांधणीसाठी प्रयत्न करेल. त्यातूनच भाजप आणि रमेश कदम समर्थकांना चांगले दिवस येतील, असे वाटले होते; मात्र कदमांना ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत ठेवण्यात आले आहे. पालिकेत पाणी सभापतिपद हे कदम समर्थक नगरसेविकेला मिळाले. हा अपवाद सोडला त्यांच्या अन्य कार्यकर्त्यांना पक्षाची पदेही मिळालेली नाहीत. पालिकेतील सत्ताधारी पालिकेच्या कारभारात कदमांना फारसे महत्त्व देत नसल्याचे दिसते. त्यांना विश्‍वासात न घेताच पोटनिवडणुकीत भाजपचा उमेदवार जाहीर करण्यात आला होता. त्यामुळे कदम समर्थकांची अस्वस्थता वाढली आहे.

कार्यकर्ते इतरत्र सक्रिय
माजी नगरसेवक महंमद फकीर यांनी कदमांबरोबर मुंबईत भाजपमध्ये प्रवेश केला होता. नुकत्याच झालेल्या पालिकेच्या पोटनिवडणुकीत त्यांनी आपल्या पत्नीला शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आणले. कदमांचे कट्टर समर्थक श्रीकृष्ण खेडेकर पुन्हा राष्ट्रवादीत सक्रिय झाले आहेत. प्रभाग ९ च्या पोटनिवडणुकीत ते राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार करताना दिसले. अशीच अवस्था ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांची झाली आहे. 

सत्तेशिवाय कार्यकर्ते टिकवणे अवघड असते. पदाशिवाय राजकारण नाही, कदमांना पक्षाने मोठी जबाबदारी द्यावी. महामंडळ किंवा शासकीय समितीचे सदस्यपद द्यावे, अशी मागणी पक्षाकडे करण्यात आली आहे. आमचा पाठपुरावा चालू आहे. लवकर निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे.
- बाळ माने, जिल्हाध्यक्ष, भाजप

Web Title: chiplun konkan news ramesh kadam rehabilitation stop