चिपळुणात शिवसेना एकाकी; उपनगराध्यक्ष भाजपचाच

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 डिसेंबर 2016

चिपळूण - काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने भाजपचे निशिकांत भोजने चिपळूणच्या उपनगराध्यक्षपदी निवडून आले. त्यांनी शिवसेनेचे मोहन मिरगल यांचा पराभव केला. भोजने यांना १५, तर मिरगल यांना १० मते पडली. अपक्ष सदस्या भाजपच्या बाजूने आल्या, तर दुसरे अपक्ष सदस्य केळस्कर तटस्थ राहिले.

चिपळूण - काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने भाजपचे निशिकांत भोजने चिपळूणच्या उपनगराध्यक्षपदी निवडून आले. त्यांनी शिवसेनेचे मोहन मिरगल यांचा पराभव केला. भोजने यांना १५, तर मिरगल यांना १० मते पडली. अपक्ष सदस्या भाजपच्या बाजूने आल्या, तर दुसरे अपक्ष सदस्य केळस्कर तटस्थ राहिले.

भाजपचा नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष होण्याची शहराच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने दिलेला शब्द पाळल्याने पाच मतांनी भाजपचे निशिकांत भोजने विजयी झाले. दापोलीत भाजपला एकाकी पाडणारी शिवसेना चिपळुणात १० नगरसेवक असूनही सत्तेपासून वंचित राहिली. सेना सभागृहातही या पद्धतीने एकाकी पडल्याचे चित्र दिसणार की काय, अशी शंका आज व्यक्त होऊ लागली.

पालिकेच्या श्रावणशेठ दळी सभागृहात सकाळी १० वाजता निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. राज्य सरकारच्या नवीन नियमानुसार नगराध्यक्षा सौ. सुरेखा खेराडे निवडणूक प्रक्रियेसाठी पीठासन अधिकारी होत्या. उपाध्यक्षपदासाठी भाजपकडून निशिकांत भोजने आणि शिवसेनेकडून मोहन मिरगल यांनी अर्ज दाखल केले होते. काँग्रेसचे पाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे चार, नगराध्यक्षांसह भाजपचे पाच आणि अपक्ष रानडे यांनी निशिकांत भोजने यांना मतदान केल्यामुळे त्यांना एकूण पंधरा मते मिळाली. शिवसेनेचे मोहन मिरगल यांना सेना नगरसेवकांची दहा मते मिळाली. अपक्ष नगरसेवक अविनाश केळस्कर तटस्थ राहिले. त्यामुळे नगराध्यक्षा सौ. खेराडे यांनी निशिकांत भोजने उपनगराध्यक्षपदी निवडून आल्याची घोषणा केली. श्री. भोजने उपनगराध्यक्ष झाल्याची घोषणा झाल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी पालिकेच्या बाहेर फटाक्‍यांची आतषबाजी केली. भाजपसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधील माजी आमदार रमेश कदमांचे समर्थक कार्यकर्त्यांनी श्री. भोजने यांचे अभिनंदन केले. त्यानंतर पालिकेतून श्री. भोजने यांची मिरवणूक काढण्यात आली. 

नरळकर, घारे, चितळे स्वीकृत नगरसेवक
शिवसेनेकडून विकी नरळकर यांची स्वीकृत नगरसेवकपदासाठी गटनेते मोहन मिरगल यांनी शिफारस केली. भाजपकडून सुरेखा खेराडे यांनी विजय चितळे यांची शिफारस केली, तर काँग्रेसकडून गटनेते कबीर काद्री यांनी हारू घारे यांची शिफारस केली. पीठासन अधिकाऱ्यांनी तीनही स्वीकृत नगरसेवकांना मंजुरी देण्यात आली.

Web Title: chiplun mayor selection