चिपळूण - रत्नागिरी विनावाहक दररोज 6 गाड्या 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 एप्रिल 2019

एक नजर

  • चिपळूण आगाराच्या वतीने महाराष्ट्र दिनापासून चिपळूण ते रत्नागिरी ही एक थांबा, विनावाहक बससेवा.
  • मुंबई मार्गावरही दर तासाला गाडी. 
  • या गाडीमुळे या मार्गावर चालणाऱ्या वडापला बसणार चाप. 

चिपळूण - येथील चिपळूण आगाराच्या वतीने महाराष्ट्र दिनापासून चिपळूण ते रत्नागिरी ही एक थांबा, विनावाहक बससेवा सुरू होणार आहे. मुंबई मार्गावरही दर तासाला गाडी सोडण्यात येणार आहे.

या गाडीमुळे या मार्गावर चालणाऱ्या वडापला चाप बसणार आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी लवकरात लवकर पोहचून तेथील कामे वेळेत उरकण्यासाठी विना थांबा गाडी हवी होती. प्रवाशांच्या मागणीचा विचार करून एसटी आगाराने ही सोय केली आहे. आता रत्नागिरी या जिल्ह्याच्या ठिकाणी प्रवाशांना जाण्यासाठी ही सोय केली आहे. लग्नसराई, उन्हाळी सुटी व नोकरी-व्यवसायासाठी ये जा करणाऱ्या प्रवाशांना या गाडीचा उपयोग होणार आहे. चिपळूण ते रत्नागिरी या बसला केवळ संगमेश्‍वर हा एकच थांबा असणार आहे.

चिपळूण आगारातून सकाळी 7.30, 8 व 9 वाजता ही गाडी सोडली जाणार आहे. रत्नागिरी येथून देखील विना वाहक तीन गाड्या सोडल्या जाणार आहेत. सायंकाळी साडेपाच, सहा व सात वाजता या गाड्या रत्नागिरी बसस्थानकावरून सोडल्या जाणार आहेत. चाकरमानी मंडळींना शासकीय कार्यालयाची कामे आटोपून गावी परतण्यासाठी या गाड्यांचा उपयोग होईल.

जिल्ह्याच्या ठिकाणी नोकरी व इतर व्यवसायासाठी ये जा करणाऱ्या नागरिकांची मोठी संख्या पाहूनच या गाड्या सुरू करण्यात येतील. मराठवाडयातून पर्यटकांनी कोकणात यावे यासाठी चिपळूण ते परळी या मार्गावर एक ऐवजी दोन गाड्या सुरू केल्या आहेत. 

उत्पन्न अडीच लाख रुपयाने वाढले
उन्हाळी सुटीत गावाकडे जाणारे प्रवासी व कोकण पाहण्यासाठी येणारे पर्यटक यांच्यामुळे मागील दोन महीन्यापासून उत्पन्न वाढले आहे. पूर्वी एक लाख उत्पन्न महिन्याला व्हायचे तोच आकडा आता अडीच लाख रुपयापर्यंत वाढला आहे. त्यामुळे उत्पन्नवाढीच्या दृष्टीने या जादा गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे असे आगारप्रमुख संदीप पाटील यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chiplun - Ratnagiri six Bus every day