नाणार संदर्भात मुख्यमंत्र्यांनी केली 'ही' घोषणा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 डिसेंबर 2019

मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या या आदेशाने नाणार परिसरात आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची निवड झाल्यानंतर रिफायनरी प्रकल्प परिसरातून जोरदार आनंद व्यक्त करण्यात आला.

रत्नागिरी -  नाणार रिफायनरी प्रकल्पा विरोधात आंदोलन करणाऱ्यावर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले होते. या आंदोलकांवरील दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. 

दरम्यान या संदर्भात आमदार नितेश राणे यांनी गुन्हे मागे घेण्याची मागणी केली होती. आरे कार शेडच्या प्रकरणात गुन्हे मागे घेत असाल तर नाणार प्रकल्पाविरोधी ज्यांनी आंदोलने केली त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यात यावीत, अशी मागणी आमदार राणे यांनी केली होती. 

हेही वाचा - नरडवे प्रकल्पग्रस्तांनी मुंबईतील बैठकीत का केला विरोध ? 

ठाकरे यांना शुभेच्छा देणारे फलक झळकले 

मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या या आदेशाने नाणार परिसरात आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची निवड झाल्यानंतर रिफायनरी प्रकल्प परिसरातून जोरदार आनंद व्यक्त करण्यात आला. नाणार रिफायनरी प्रकल्पाविरोधात ठोस भूमिका घेताना दिलेला शब्द खरा करणारे उध्दव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि त्यांचे अभिनंदन करीत पुढील वाटचालीला शुभेच्छा देणारे फलक प्रकल्प परिसरात झळकले आहेत. 

हेही वाचा - देवगडची विरोधी बाकाची परंपरा कायम 

अशोक वालम यांच्या नेतृत्वात आंदोलने

मागील दोन वर्षांपासून नाणार परिसरात शासनाने आणलेल्या रिफायनरी प्रकल्पाला परिसरातून मोठ्या प्रमाणावर विरोध झाला. या कालखंडात कोकण रिफायनरी विरोधी प्रकल्प संघटना व कोकण शक्ती महासंघाचे अध्यक्ष अशोक वालम यांच्या नेतृत्वाखाली ही आंदोलने पार पडली होती. या आंदोलनाना भाजप वगळता अन्य पक्षानी पाठिंबा दिला होता. त्यामध्ये सुरवातीपासुनच शिवसेना देखील आघाडीवर होती. उध्दव ठाकरे यानी प्रकल्प परीसरात येऊन कोणत्याही परिस्थितित रिफायनरी प्रकल्प नाणारमधून हद्दपार केल्याशिवाय रहाणार नाही, आम्ही जनतेसमवेत असल्याची ग्वाही दिली होती.

नाणार रिफायनरी प्रकल्पग्रस्तांकडून स्वागत

गत लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शासनाने रिफायनरी प्रकल्पाची अधिसूचना रद्द केल्याची घोषणा केली. शिवसेनेच्या वाढत्या दबावामुळेच शासनाला तो निर्णय घेणे भाग पडले होते. शिवसेना कायमच रिफायनरी प्रकल्पाविरोधात राहिली. आता राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. सेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांचा शपथविधी झाला आणि नाणार प्रकल्पग्रस्तान्नी जोरदार स्वागत केले. रिफायनरी प्रकल्पाला विरोध करणारी शिवसेनेने राज्यात सरकार स्थापन झाल्याने रिफायनरी प्रकल्प कोकणातून निश्‍चीतच हद्दपार होणार असा विश्वास प्रकल्पग्रस्त जनतेला वाटत आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे अभिनंदन करणारे फलक तालुक्‍यातील डोंगरतिठा व कात्रादेवीवाडी येथे लावण्यात आले आहेत.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CM Uddhav Thackeray Announcement On Nanar Refinery Project