किनाऱ्यांची सुरक्षितता ग्रामपंचायतींच्या हाती 

राजेश कळंबटे
शुक्रवार, 21 एप्रिल 2017

रत्नागिरी -स्वच्छतेतून पर्यटनाला चालना देताना किनाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी मेरिटाइम बोर्डाने निर्मल सागर तट अभियान राबविले आहे. त्यासाठी जिल्ह्यातील 26 किनाऱ्यांची निवड केली असून, तीन कोटी 20 लाख रुपये निधी ग्रामपंचायतींना दिला आहे. याअंतर्गत रोजगारासाठी जलक्रीडा किंवा वाळू शिल्प बनविण्याचे उपक्रम राबविले जाणार आहेत. पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी जीवरक्षकांची नेमणूक केली जाणार आहे. याची संपूर्ण जबाबदारी त्या-त्या ग्रामपंचायतींकडे सोपविली आहे. 

पर्यटनातून विकास याचा अभ्यास करून मेरिटाइम बोर्डाने पावले उचलली आहेत. यासाठी किनाऱ्यांवरील स्वच्छतेला प्राधान्य दिले आहे. गेले सहा महिने बोर्डाने जिल्ह्यात ग्रामस्थांच्या सहकार्याने स्वच्छता मोहीम राबविली आहे. किनारे कायमस्वरूपी स्वच्छ ठेवले, तर पर्यटक आकर्षित होतील. त्या पर्यटकांना खिळवून ठेवण्यासाठी आणि त्यातून रोजगारनिर्मिती करण्याचा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून आराखडा तयार केला जात आहे. दर्जानुसार जिल्ह्यातील किनाऱ्यांची निवड केली. त्यात "अ अधिक'मध्ये गणपतीपुळे, आरे-वारे आणि भाट्ये यांची निवड केली आहे. त्यांना प्रत्येकी वीस लाख रुपये, "अ' गटातील सहा किनाऱ्यांना 15 लाख रुपये आणि "ब' गटातील 17 किनाऱ्यांना प्रत्येकी 10 लाख रुपये देण्यात आले आहेत. बोर्डाच्या निकषांनुसार त्यांचा आराखडा ग्रामपंचायतींनी तयार करावयाचा आहे. हा निधी या आर्थिक वर्षात खर्च करावयाचा असून, त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली व्यवस्थापन समिती स्थापन केली आहे. 

किनाऱ्यांची स्वच्छता ठेवली, तर पर्यटक आनंदाने येतील. त्यातून स्थानिकांना रोजगार मिळेल, हा बोर्डाचा उद्देश आहे. त्यासाठी निर्मल सागरी तट अभियान राबविले जात आहे. किनाऱ्यांवर जलक्रीडा, वाळूशिल्प बनविणे आदी उपक्रम घेतले जाणार आहेत, त्यासाठी ग्रामपंचायतींना निधी दिला आहे. 
- कॅप्टन संजय उगलमुगल, बंदर अधिकारी 

प्रोत्साहनपर पुरस्कार 
उपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी पुरस्कार योजनाही आहे. त्यात उत्कृष्ट सागर तट व्यवस्थापनात 50 लाख, 25 लाख आणि 11 लाख रुपये पारितोषिक, निर्मल सागरअंतर्गत 21 लाख, 11 लाख, 5 लाख रुपये, तर रोजगार सृजन व कौशल्य विकास स्पर्धा 21 लाख, 11 लाख व 5 लाख रुपये पारितोषिक किनाऱ्यांसाठी ठेवले आहे. 

Web Title: Coastal safety issue