महामार्गाचे काम पूर्ण करताना सरकारी नियमांना बगल

सुनील पाटकर
शनिवार, 12 जानेवारी 2019

महामार्गावरील अवघड वाहतूक व सुरक्षा याबाबत खबरदारी घेण्याबाबत संबंधित विभाग व काम करणारी कंपनी यांना पत्र दिले जाईल. तसेच गरज भासल्यास आवश्यक ती कारवाईही केली जाईल.

- सुरेश वराडे, वाहतूक पोलिस निरीक्षक, रायगड

महाड : नियम ठेवा बाजूला, पहिले महामार्गाचे काम करा, अशा स्थितीत सध्या इंदापूर ते कशेडी दरम्यान मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण सुरु आहे. या कामातील ओव्हरलोड वाहतुकीकडे पोलिसांचे दुर्लक्ष सुरक्षेकडे महामार्ग विभागाचा कानाडोळा तर माती उत्खनन व नदीतील गोटा काढण्याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे.

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे ठिकठिकाणी खोदकाम, माती भराव, बांधकाम सुरु असल्याने महामार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची ये-जा सुरु आहे. महामार्गाच्या कामातील हि वाहने प्रमाणापेक्षा अधिक माल वाहतूक करत असून ही वाहतूक रात्रभर सुरु असते. या वाहनांतून रस्त्यावर माती, दगडाचे बारीक कण उडत असल्याने मागून येणाऱ्या वाहनचालकांना याचा त्रास होत आहे. एकीकडे महामार्ग पोलिस महामार्गावरून धावणाऱ्या इतर अवजड वाहनांवर कारवाई करतात. पण दुसरीकडे मात्र या माती वाहून नेणाऱ्या वाहनांना वाट मोकळी असल्याचे दिसत आहेत.  

महामार्ग पूर्ण होण्यास अवधी असल्याने सद्याचा महामार्ग सुस्थितीत ठेवणे आवश्यक आहे. महामार्गाचे काम सुरु असलेल्या ठिकाणी ठोस सुरक्षा दिसून येत नाही. केवळ एक ते दोन कर्मचारी संबंधित कंपनीने तैनात केल्याचे दिसून येत आहे. डोंगर खोदकाम करत असताना वरून येणाऱ्या मातीला किंवा दगडाला थांबवण्याची व्यवस्था केलेली नाही. यामुळे अनेक ठिकाणी सुरक्षेचा अभाव दिसून येतो. अनेकवेळा ऐन गर्दीच्या वेळेतच महामार्गावरील वृक्ष तोडणे, सुरुंग लावणे, ही कामे केली जात आहेत. यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. अवजड वाहनांनी जुना मार्ग देखील बाद होत आहे.

महामार्गाला लागणारा दगड, माती याच परिसरातून आणली जात आहे. अनेक ठिकाणी पूर्वपरवानगीसाठी केवळ अर्ज दाखल करून काम सुरु केले जात आहे. अर्ज मंजूर होण्यास विलंब करून त्या दिवसात वारेमाप माती उत्खनन करून घेतले जात आहे. सावित्री नदीमधील गोटे काढण्यास पाटबंधारे व महसूल विभागाची परवानगी नसतानाही ठेकेदार यंत्रसामुग्री वापरुन सावित्रीचे पात्र बिघडवण्याचे काम करत आहेत. महामार्गाचे काम पूर्ण करताना सरकारी नियमांना बगल दिली जात असल्याचे दिसत आहे.

Web Title: Completing Highway Work Beside Government Rules