esakal | आयर्लंडची कमाल! काटेकोर नियमावलीने कोरोनाला रोखलं

बोलून बातमी शोधा

आयर्लंडची कमाल! काटेकोर नियमावलीने कोरोनाला रोखलं

आयर्लंडची कमाल! काटेकोर नियमावलीने कोरोनाला रोखलं

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

डब्लिन : अटलांटिक महासागराने वेढलेले, पाचूसारखं हिरवेगार बेट म्हणजे आयर्लंड. युरोपमधील हे चौथ्या क्रमांकाचं बेट. सभोवती स्वच्छ सागरी किनारा, निखळ सृष्टीसौंदर्य, स्वच्छ सुंदर रस्ते, सौजन्यशील रहिवासी आणि कमालीची सुरक्षितता. आयर्लंडची राजधानी डब्लीनपासून 50 किलोमीटर अंतरावर ट्रिम येथे रिसर्च अँड डेव्हलपमेंट सायंटिस्ट पदी कार्यरत असलेल्या हर्षदा पाटील सांगत आहेत तिथल्या कोरोना वर्तमानाविषयी...

इथं दिवसा 9 ते 10 तर रात्री 2 ते 3 सेल्सियस इतके तापमान असते. हिवाळ्यात कधी कधी बर्फाची चादरच पसरलेली असते. नेहमीच थंड वारे वाहतात. अशा वातावरणात आयर्लंड सरकारने कोरोना नियंत्रणासाठी केलेली कामगिरी कौतुकास्पद आहे. सध्या इथं तिसरी लाट आहे. सरकारने तीन महिन्यांपासूनची टाळेबंदी नुकतीच खोलली आहे. शाळा, मॉल्स, दुकाने, उपाहारगृहांना परवानगी दिलीय. थोडाफार जीवनावश्‍यक वस्तूंचा तुटवडा जाणवतोय. मास्कसह कोरोना नियमावली पालनाची सक्ती आहे. फिरायचं तर 2 ते 5 किलोमीटरपर्यंतची मुभा आहे. इथलं 66 टक्के अर्थकारण सेवा उद्योगावर बेतलं आहे. सध्या अत्यावश्‍यक सेवा उद्योगात काम करणाऱ्यांनाच बाहेर पडण्याची परवानगी आहे.

हेही वाचा: नाद करायचा नाय! फॉर्च्युनर गाडीतून वांग्याची विक्री, चर्चा तर होणारच

कोरोना नियमावलीचे काटेकोर पालन हेच कोरोना नियंत्रणाचे प्रभावी कारण ठरले आहे. दररोज डिजिटल मशिन्सद्वारे ताप तपासून कामावर रुजू व्हावं लागते. बस आणि रेल्वेत 25 टक्के क्षमतेइतकेच प्रवासी असतात. परदेशातून आलेल्यांना 14 दिवस हॉटेलमध्ये कॉरंटाईन सक्तीचे. गतवर्षीपासून यात बदल नाही. गेल्या वर्षभरात कोरोना स्वयंसेवकांना विशेष प्रशिक्षण दिले आहे.

सध्या रुग्णसंख्या कमी झाली आहे. 16 ते 69 पर्यंतच्या लोकांचं जलदगतीने लसीकरण केले जात आहे. त्यात हॉस्पिटल स्टाफ, नर्सेस, डॉक्‍टर्स या सर्वांना प्राधान्य आहे. ऍस्ट्रा झेनेका, फायजर या लसी दिल्या जात आहेत. वयोगटानुसार, टप्प्याटप्प्याने लसीकरणाची सोय असून त्यासाठी ऑनलाईन नोंदणीची व्यवस्था आहे. आता वर्षभरात ऑनलाईन शिक्षण चांगलेच रुजले आहे.

हेही वाचा: कर्नाटकातही 14 दिवस Lockdown, उद्यापासून अंमलबजावणी

सरकारने लोकांना ऑनलाईन कामासाठी मदत दिलीय. आणि बेरोजगारांना भत्ताही वेळवर दिला आहे. ज्यांना हजरच रहावे लागते अशा कामगारांना वेगवेगळ्या शिफ्टमध्ये कामाची व्यवस्था केली आहे. त्यामुळे गर्दी टाळून काम सुरू आहे. कोविड बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींची शोधमोहीम अखंडपणे सुरू आहे. मागील अनुभवातून शहाणे होत इथल्या सरकारने आणि नागरिकांनी कोरोना नियमावलीचे काटेकोर पालन करून कोरोना नियंत्रणात ठेवलेय.