Loksabha 2019 : कोकणात काँग्रेसचे जुने कार्यकर्ते होताहेत सक्रिय

तुषार सावंत
मंगळवार, 12 मार्च 2019

कणकवली - देशात मोदींची लाट काही प्रमाणात ओसरत आल्याने काँग्रेसला चांगले दिवस येतील, अशी आशा आता कार्यकर्त्यांना वाटू लागली आहे. सिंधुदुर्गात मरगळलेली काँग्रेस आता पुन्हा जोमाने उभी राहत असून काँग्रेसचे जुने कार्यकर्ते हळूहळू सक्रिय होऊ लागले आहेत.

कणकवली - देशात मोदींची लाट काही प्रमाणात ओसरत आल्याने काँग्रेसला चांगले दिवस येतील, अशी आशा आता कार्यकर्त्यांना वाटू लागली आहे. सिंधुदुर्गात मरगळलेली काँग्रेस आता पुन्हा जोमाने उभी राहत असून काँग्रेसचे जुने कार्यकर्ते हळूहळू सक्रिय होऊ लागले आहेत. त्यामुळे जुने व नवीन अशी काँग्रेसची टीम शिवसेना-भाजपला तसेच स्वाभिमानलाही रोखण्यासाठी तयारी करत आहे.

नारायण राणे यांनी काँग्रेसलाच सोडचिठ्ठी दिल्यानंतर जिल्ह्यातील काँग्रेसचे जुने कार्यकर्ते एकवटले. गेले वर्षभर पक्षाला उभारी देण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. राणेंचे काही सहकारी काँग्रेसकडे परतले तर काही पुन्हा काँग्रेसच्या वाटेवर आहेत; मात्र जिल्हा काँग्रेसपुढे मोठे आव्हान निवडणुका लढण्याचे आहे. जिल्हा व तालुका कार्यकारणी गठित झाल्या असल्या तरी गाव पातळीवर काँग्रेसच्या जुन्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी आता जिल्हा कार्यकारणी व तालुका कार्यकारणी सक्रिय झाली आहे.

गावागावांत जुन्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन नवीन कार्यकर्ते घडवले जात आहेत. काँग्रेस हा देशाचा बलाढ्य पक्ष मानला जातो. सिंधुदुर्गात समाजवाद्यांच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसने वर्षानुवर्षे जोर धरले आहे. काँग्रेसचा जुना मतदार आजही हाताच्या चिन्हाबाहेर जात नाही, ही वस्तुस्थिती आहे; मात्र मधल्या कालावधीत शिवसेना म्हणजेच राणेंच्या झंझावाताने जिल्ह्यातील काँग्रेस मरगळत गेली. काँग्रेसचे अनेक नेते राणेंसोबत गेले. परंतु राणे जेव्हा काँग्रेसमध्ये आले तेव्हा त्यांच्याच कार्यकर्त्यांचा धबधबा काँग्रेसमध्ये होता. त्यामुळे जुने कार्यकर्ते नाराज असायचे, सरळसरळ दोन गट कार्यरत असायचे.

काही जुन्या लोकांनी मागच्या निवडणुकांमध्ये सक्रिय कामही केलेले नाही. कारण ते राणेंचे विरोधक म्हणूनच वावरत राहिले; मात्र राणेंनी काँग्रेस सोडल्यानंतर जुने, जाणते काँग्रेसचे कार्यकर्ते पुन्हा सक्रिय झाले. त्यानंतर काँग्रेस पक्षाला जिल्ह्यात उभारी देण्याचा प्रयत्न सुरू झाला. प्रदेश पातळीवरूनही जुन्या मंडळीना निमंत्रण देऊन त्यांना बळकटी आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले.
गेल्या दोन-तीन महिन्यांत काँग्रेसने चांगले कार्यक्रम हाती घेतले. त्यामुळे तालुकास्तरावर काँग्रेस व त्यांचे कार्यकर्ते सक्रियपणे पक्षासाठी झोकून काम करू लागले. खऱ्या अर्थाने काँग्रेस ही ग्रामीण भागात आजही टिकून आहे.

काँग्रेसने जिल्ह्यात गावागावांमध्ये आपली फळी उभी करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून जोरदार तयारी सुरू केली. जिल्हा व तालुकास्तरावरच्या बैठका सुरू झाल्या. शहरी भागात काँग्रेसने हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. मधल्या काही निवडणुकांमध्ये काँग्रेसने स्वबळावर लढण्याचा प्रयत्न केला. आता तर लोकसभा ही काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी करून निवडणूक रिंगणात उतरत आहे.

जागावाटपाचा फार्मूला जवळपास पूर्वीप्रमाणेच आहे. त्यामुळे रत्नागिरी व सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघ हा काँग्रेसच्या वाट्याला आहे. या मतदारसंघात नवीनचंद्र बांदिवडेकर हे लोकसभेचे उमेदवार असणार आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे कार्यकर्ते त्यांना निवडून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत; परंतु गावागावात काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते तयार करणे ही जबाबदारी आता स्तानिक काँग्रेस नेत्यानी आपल्या खांद्यावर घेतली आहे. त्यामुळेच काँग्रेस आता तरुण कार्यकर्त्यांच्या शोधात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress active in Konkan