बिघाडीनंतरही काँग्रेस पुन्हा आघाडीसाठी इच्छुक

बिघाडीनंतरही काँग्रेस पुन्हा आघाडीसाठी इच्छुक

दापोलीत भाजप-शिवसेनेतील वितुष्ट वाढले; राष्ट्रवादीच्या भूमिकेबाबत उत्सुकता
दापोली - दापोली नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी चाललेल्या राजकीय लढाईत काँग्रेसच्या मदतीने शिवसेनेने बाजी मारून उल्का जाधव यांना नगराध्यक्षपदी बसविण्यात यश मिळवले; मात्र या सर्व घडामोडीत गेली पंचवीस वर्षे मित्र असलेल्या सेना-भाजपमध्ये यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत राजकीय दरी वाढण्याची शक्‍यता आहे.

निवडणूक एकत्र लढल्यानंतर राष्ट्रवादीची काडीमोड घेत काँग्रेसने सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याने आगामी निवडणुकीत काँग्रेसशी राष्ट्रवादी हातमिळवणी करणार का, याबाबत उत्सुकता आहे.

नगरपंचायतीच्या निवडणूक निकालानंतर गेले २८ दिवस सुरू असलेली सत्तेची रणधुमाळी अखेर सोमवारी संपुष्टात आली. मतमोजणीनंतर त्रिशंकू असलेल्या १७ सदस्यांच्या नगरपंचायत सभागृहात बहुमतासाठी ९ आकडा गाठणे आवश्‍यक होते. सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून आलेल्या सेनेकडे ७, राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडे प्रत्येकी ४, तर भाजपकडे दोन सदस्य होते.

युतीला सत्ता ताब्यात घेण्यासाठी आवश्‍यक ९ सदस्य असूनही युतीचा नगराध्यक्ष करता आला नाही. आमदार संजय कदम यांनी भाजपला पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली; मात्र आघाडीतील दुसरा भागीदार काँग्रेसने विरोध करून आपला स्वतंत्र गट स्थापन केला. आघाडीत झालेल्या बिघाडीचा फायदा सेनेने काँग्रेसबरोबर बोलणी करून सत्ता मिळविण्यात पुढाकार घेतला. 

दापोली नगरपंचायतीच्या इतिहासात प्रथमच नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षपदी महिलांची वर्णी लागली आहे. काँग्रेसने उपनगराध्यक्षपदी रझिया रखांगे यांना संधी दिली. या सर्व सत्तेच्या खेळात पुढील पाच वर्षे नवीन सत्ताधाऱ्यांचे जुने मित्र भाजप आणि राष्ट्रवादी विरोधी पक्ष म्हणून कशी कामगिरी करतात याकडे दापोलीवासीयांचे लक्ष आहे. नगरपंचायतीत झालेली नवीन आघाडी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत कोणती भूमिका घेणार याबाबत राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहे. 

आमदार भाई जगताप यांनी पुढील निवडणुकीसाठी सन्मानजनक जागा वाटप झाल्यास काँग्रेसबरोबर आघाडी करून जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक लढण्याची तयारी दाखवली आहे. नगरपंचायतीच्या निवडणुकीचा अनुभव पाहता राष्ट्रवादीच्या आगामी निवडणुकीतील भूमिकेबाबत आता उत्सुकता आहे.
 

काँग्रेसची वाढ होण्यासाठी कार्यकर्त्यांना सत्तेचा लाभ मिळणे आवश्‍यक असल्याने कार्यकर्त्यांनी शिवसेनेबरोबर आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे. कोणत्याही पक्षाला बहुमत नसल्याने इतर पक्षांसोबत फरफटत जाण्यापेक्षा शहराच्या विकासासाठी शिवसेनेबरोबर सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय सद्य:स्थितीत योग्य आहे.
- मधुकर दळवी, जिल्हा सरचिटणीस,काँग्रेस.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com