कॉंग्रेसच्या रडारवर भाजप, राष्ट्रवादी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 नोव्हेंबर 2016

प्रचाराचा गाभा
देवगड-जामसंडे प्रभागात भेडसावणाऱ्या बहुतांशी समस्या सारख्याच असल्याचे दिसते. पिण्याचे पाणी, सांडपाण्याची गटारे ही समस्या सर्वांनाच जाणवत आहे. त्यातच अंतर्गत रस्ते, विविध नागरी सुविधा गरजेच्या आहेत. हा ही प्रचाराचा गाभा असणार आहे.

देवगड ः येथील देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या निवडणुकीवर कॉंग्रेसच्या रडारवर भाजप व राष्ट्रवादी आहे. पहिल्याच निवडणुकीत सत्ताधीश होण्यासाठी राजकीय पक्षांची डावपेचांची खेळी सुरू झाली आहे. नगराध्यक्ष बसण्याच्या दृष्टीने पुरेसे नगरसेवक निवडून येण्यासाठी प्रचारात विविध फंडे वापरले जाण्याची शक्‍यता दिसते.
देवगड व जामसंडे या दोन ग्रामपंचायतींची मिळून नगरपंचायत झाली आहे. तत्कालीन देवगड ग्रामपंचायतीचे 6 प्रभाग व सदस्य संख्या 17 होती. गावातील वाडी व नगरांची संख्या 19 इतकी होती. त्या वेळी ग्रामपंचायतीत कॉंग्रेसला सत्तेपासून दूर ठेवत राष्ट्रवादीचा सरपंच व शिवसेनेचा उपसरपंच असे चित्र होते, तर जामसंडे ग्रामपंचायतीचे 5 प्रभाग व सदस्य संख्या 15 होती. गावातील वाडी व नगरांची एकूण संख्या 31 इतकी होती. तेथे सरपंच व उपसरपंच भाजपचेच होते. त्यामुळे आता नव्याने निर्माण झालेल्या नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादी व भाजपला आपले वर्चस्व राखण्यासाठी प्रयत्नशील राहावे लागणार आहे; मात्र पहिल्याच होणाऱ्या या निवडणुकीत सत्ताधीश होण्यासाठी कॉंग्रेसनेही कंबर कसली आहे. राष्ट्रवादी व भाजपला रोखण्यासाठी त्यांच्याकडून प्रयत्न राहणार असल्याचे दिसते. त्यादृष्टीने राजकीय हल्लाबोल करण्यास सुरवातही झाली आहे. विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली जाणार असल्याचे कॉंग्रेस व राष्ट्रवादीकडून जाहीर केले आहे, तर जनता सुचवेल तोच युतीचा अजेंडा असेल भाजप व शिवसेनेकडून सांगण्यात आले आहे; मात्र या राजकीय लढाईत अपक्षांकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. 57 उमेदवारांमध्ये 13 अपक्ष असून, त्यामुळे राजकीय पक्षांच्या उमेदवारांना बऱ्यापैकी फटका बसू शकतो, हे ध्यानी घेतले पाहिजे. प्रमुख उमेदवारांच्या विजयामध्ये ते अडसर ठरू शकतील, हेही नाकारून चालणार नाही. नगरपंचायतीच्या एकूण 17 प्रभागांत मिळून एकूण 11 हजार 206 मतदार आहेत. त्यामुळे मतदार कोणाच्या बाजूने कौल देणार हेही कळेल.

प्रचाराचा गाभा
देवगड-जामसंडे प्रभागात भेडसावणाऱ्या बहुतांशी समस्या सारख्याच असल्याचे दिसते. पिण्याचे पाणी, सांडपाण्याची गटारे ही समस्या सर्वांनाच जाणवत आहे. त्यातच अंतर्गत रस्ते, विविध नागरी सुविधा गरजेच्या आहेत. हा ही प्रचाराचा गाभा असणार आहे.

Web Title: congress on radar of bjp, ncp