रायगडमध्ये "अपना हाथ जगन्नाथ'

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 डिसेंबर 2016

अलिबाग - जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका रायगड जिल्ह्यात कॉंग्रेसने स्वबळावर लढवाव्यात, "अपना हाथ जगन्नाथ' अशी भूमिका अलिबाग तालुक्‍यातील कॉंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घेतली आहे.

अलिबाग - जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका रायगड जिल्ह्यात कॉंग्रेसने स्वबळावर लढवाव्यात, "अपना हाथ जगन्नाथ' अशी भूमिका अलिबाग तालुक्‍यातील कॉंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घेतली आहे.

या निवडणुकांची रणनीती ठरविण्यासाठी गुरुवारी (ता. 15) बॅ. ए. आर. अंतुले भवनात कॉंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक झाली. या बैठकीत ही भूमिका मांडण्यात आली.
फेब्रुवारीत जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका होण्याची शक्‍यता आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस-शेतकरी कामगार पक्षाच्या आघाडीसोबत सख्य करावे, असाही एक मतप्रवाह कॉंग्रेसमध्ये आहे. त्याला अलिबाग तालुक्‍यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विरोध दर्शविला.

रायगड जिल्ह्यात आतापर्यंत जेव्हा जेव्हा कॉंग्रेसने इतर पक्षांसोबत आघाडी केली, त्यावेळी कॉंग्रेसला नुकसानच सहन करावे लागले. जिल्ह्यात शेकापच्या विरोधात कॉंग्रेस लढा देत आहे. असे असताना काही जण शेकापसोबत आघाडी करण्याची इच्छा व्यक्त करीत आहेत. आपला या आघाडीला पूर्णपणे विरोध आहे, असे ठाम म्हणणे अलिबाग तालुका कॉंग्रेस ओबीसी सेलचे अध्यक्ष सुनील थळे यांनी मांडले.

कॉंग्रेस पक्षाचा आधार घेऊन मोठे झालेल्यांना आता त्यांची जागा दाखवायची वेळ आली आहे. निवडणूक कॉंग्रेसचे सहकार्य घेऊन जिंकायची आणि निवडून आल्यावर मी स्वतःच्या ताकदीवर निवडून आलो म्हणून कॉंग्रेसला हिणवायचे, अशी भूमिका यापूर्वी कॉंग्रेससोबत आघाडी केलेल्या पक्षांनी घेतली आहे. या निवडणुकीत मतदारांसमोर कॉंग्रेस ताठ मानेने मत मागायला जाईल, असे कॉंग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा ऍड. श्रद्धा ठाकूर म्हणाल्या. तालुक्‍यातील इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही आगामी निवडणुका स्वबळावरच लढवाव्यात, अशी भूमिका घेतली.

Web Title: congress in raigad