'आपलं ते आपलं अन् दुसऱ्याचं तेही आपलं'; सेनेचे आमदारावर टीका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Politics

माझ्यावर खोटारडेपणाचा आरोप करण्याऐवजी त्यांनी आधी स्वतःकडे पाहावे

'आपलं ते आपलं अन् दुसऱ्याचं तेही आपलं'; सेनेचे आमदारावर टीका

राजापूर : ओणी-पाचल अणुस्कुरा मार्गाच्या कामासाठी शासनाकडून ७ कोटी ४४ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून आपण सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे हा निधी मंजूर झाला आहे; मात्र, 'आपलं ते आपलं आणि दुसऱ्याचं तेही आपलं', असं म्हणून फुकाचे श्रेय लाटण्याची शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांना सवयच झालेली आहे. त्यामुळे माझ्यावर खोटारडेपणाचा आरोप करण्याऐवजी त्यांनी आधी स्वतःकडे पाहावे, अशी टीका काँग्रेसच्या जनरल सेक्रेटरी अ‍ॅड. हुस्नबानू खलिफे यांनी केली आहे.

विकासकामाचे फुकटचे श्रेय लाटण्याऐवजी ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी स्वकर्तृत्वाने निधी आणून त्याचे खुशाल श्रेय घ्यावे, असा टोलाही त्यांनी लगावला. तालुक्यातील ओणी-पाचल अणुस्कुरा मार्गाच्या दुरुस्तीसाठी बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी ७ कोटी ४४ लाखाचा निधी मंजूर केला आहे. त्या निधी मंजुरीवरून सध्या श्रेयवाद रंगला आहे. आपण सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे हा निधी मंजूर झाल्याचा दावा माजी आमदार खलिफे यांनी केला आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीचा प्रस्ताव शासनस्तरावर पाठवल्यापासून चव्हाण यांच्याकडे हा विषय आपण लावून धरला होता.

हेही वाचा: दापोलीत खळबळ: अनंत मोहिते यांच्या मुलीचा राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश

या रस्त्याच्या दुरवस्थेची स्थानिकांसोबत तीनवेळा आपणही पाहणीही केली होती आणि या रस्त्याच्या दुरुस्तीची निकड सार्वजनिक मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली होती. यानंतर हा प्रस्ताव मंजूर करण्याचे आश्वासन चव्हाण यांनी दिले होते. त्याबाबत आपण पत्रकारांना माहिती देऊन या रस्त्यासाठी सात कोटी ४४ लाखाचा निधी मंजूर होणार असल्याची माहिती दिली होती. मात्र, त्यानंतर तत्काळ पत्रकार परिषद घेत आमदार साळवी यांनी या रस्त्यासाठी एकही रुपयाचा निधी मंजूर झालेला नसून खलिफे या खोटी माहिती देत असल्याचे व दिशाभूल करत असल्याचा आरोप केला होता. मात्र, अशाप्रकारे आपणावर खोटारडेपणाचा आरोप करणारे आमदार साळवी आता स्वतःच उघडे पडले आहेत.

ग्रामीण भागात अनेक रस्ते नादुरुस्त

मतदार संघाचा त्यांना खरोखरच विकास करायचे असेल आणि त्याचे श्रेय घ्यायचे असेल तर ग्रामीण भागातील अनेक रस्ते नादुरुस्त आहेत त्यासाठी निधी आणावा आणि खुशाल श्रेय घ्यावे त्यांना कुणीही अडवलेले नाही, असा सल्लाही खलिफे यांनी आमदार साळवी यांना दिला आहे.

हेही वाचा: एक कोटी 14 लाखांचा दरोडाप्रकरणी 2 आरोपींना 6 वर्षांची सक्तमजुरी व दंड

loading image
go to top