esakal | रत्नागिरी ते रोहा कोकण रेल्वे धावणार विजेवर : आॅक्टोबर महिन्यात होणार चाचणी
sakal

बोलून बातमी शोधा

Connection of four power sub stations between Ratnagiri to Roha is in the final stage

रत्नागिरी ते रोहा दरम्यान चार विद्युत उपकेंद्रांच्या जोडणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे

रत्नागिरी ते रोहा कोकण रेल्वे धावणार विजेवर : आॅक्टोबर महिन्यात होणार चाचणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. रत्नागिरी ते रोहा दरम्यान चार विद्युत उपकेंद्रांच्या जोडणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. डिसेंबरपर्यंत या मार्गावर विद्युतीकरणावर गाड्या सुरू करण्याचा मानस कोकण रेल्वे प्रशासनाचा आहे. त्यादृष्टीने पुढच्या महिन्यात याची चाचणी घेण्यात येणार आहे.

कोकण रेल्वेला इंधनापोटी मोठा खर्च करावा लागत आहे. हा खर्च कमी होण्यासाठी विद्युतीकरणाची प्रक्रिया गेल्या तीन वर्षांपासून सुरू करण्यात आली आहे. यासाठी माणगाव, कळंबणी, आरवली रोड, रत्नागिरी, खारेपाटण, कणकवली, थिवी याठिकाणी ट्रॅक्शन उपकेंद्रे उभारण्यात येणार आहेत. यापैकी माणगाव, कळंबणी, आरवली रोड, रत्नागिरी ही चार उपकेंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. त्याचे काम अंतिम टप्प्यात असून वायरिंग पूर्ण झाले आहे.

हेही वाचा- ‘नाणारच्‍या चौदाशे एकर जमिनीच्या व्यवहारात मुख्यमंत्र्यांचे नातेवाईक’ -


रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून अंतिम चाचणी घेतली जाणार आहे. त्यानंतरच त्यांच्याकडून अंतिम परवानगी देण्यात येईल. कोकण रेल्वेला विद्युतीकरणासाठी डिसेंबर २०२० ची कालमर्यादा देण्यात आली आहे. मध्यंतरी लॉकडाऊनच्या काळात काम थांबले होते. मात्र, एप्रिलनंतर आता वेगाने सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.


रोहा ते कर्नाटकातील ठोकूर या ७३८ किलोमीटर लांबीच्या मार्गावर सर्व गाड्या मे २०२१ पर्यंत विद्युतीकरणावर सुरू करण्याचा रेल्वे प्रशासनाचा मानस आहे. त्यादृष्टीने गेल्या तीन वर्षांपासून विद्युतीकरणाचे काम सुरू आहे. आता या कामाला गती आली आहे. रोहा ते वेर्णा (गोवा) आणि वेर्णा ते ठोकूर (कर्नाटक) या दोन टप्प्यांमध्ये हे काम होणार असून सुमारे ११०० कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी ४५६ कोटी रूपयांचा खर्च करण्यात आला आहे.

संपादन - अर्चना बनगे