रुग्णांचे समाधान हिच खरी रुग्ण सेवा -  डाॅ. उमेश दोशी

अमित गवळे
बुधवार, 24 जानेवारी 2018

भ्रष्टाचाराचा निखारा बहुतेकांच्या अंतरमनात जोरात भडकत आहे, त्याच्यावर काही लोक बेईमानीची फुंकर मारतात. त्यामुळे या निखार्यावर इमानदारीचे पाणी टाकूण त्याला विझवायला पाहिजे. अन्यथा तो निखारा अापल्याला व अापल्या पुढच्या पिढीला जाळून टाकेल

पाली - माणगाव येथील डाॅ. उमेश दोशी यांना कंझूमर राईट्स अाॅर्गनाईझेशन, महाराष्ट्र, माणगाव यांच्या तर्फे नुकताच वैद्यकिय क्षेत्रातील पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या प्रमाणिक व अादर्श रुग्णसेवेबद्दल त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे.

डाॅ. उमेश दोशी मागील पंधरा वर्षापासून अविरत वैद्यकिय सेवा पुरवित आहे. ते एक नामांकित होमिओपॅथ अाहेत. कुठल्याही कमिशनला व कट प्रॅक्टिसला बळी न पडता ते अतिशय वाजवी दरात प्रमाणिकपणे रुग्नसेवा करत आहेत. पेशंटवर अनावश्यक अौषधांचा व टेस्टचा भडिमार करत नाहीत. असे त्यांच्या रुग्णांचे म्हणणे आहे. डाॅ. दोशी यांच्या मते प्रत्येक डाॅक्टरने अापल्या रुग्नाचा फायदा बघुन त्यांचे समाधान करण्यावर अधिक भर दिला पाहिजे. डाॅ. दोशींनी सकाळला सांगितले की "भ्रष्टाचाराचा निखारा बहुतेकांच्या अंतरमनात जोरात भडकत आहे, त्याच्यावर काही लोक बेईमानीची फुंकर मारतात. त्यामुळे या निखार्यावर इमानदारीचे पाणी टाकूण त्याला विझवायला पाहिजे. अन्यथा तो निखारा अापल्याला व अापल्या पुढच्या पिढीला जाळून टाकेल" वाईट काही क्षणात करता येते, पण चांगले करण्यासाठी उभे अायुष्य घालवावे लागते.  त्यामूळे नेहमीच चांगले करण्याचा माझा प्रयत्न असतो. इमानदारीची भाकरी महाग असते, पण चविष्ट असते. अनेक चांगले डाॅक्टर अशा प्रकारे अापले काम अतिशय प्रमाणिकपणे व निष्टेने करत आहेत. असे डाॅ. उमेश दोशी म्हणाले.

या कार्यक्रमाचे उद्घाटक व मार्गदर्शक आमदार सुनील तटकरे होते. विशेष अतिथी रायगड जी.प अध्यक्षा अदिती तटकरे या होत्या. प्रमुख उपस्थिती अली कौचाली, प्रमोद घोसाळकर, राजू साबळे आदि मान्यवर उपस्थित होते.

Web Title: consumer rights organization konkan umesh doshi