esakal | कोकणात कोरोना नियंत्रणाचा 'दिगशी' फॉर्म्युला हिट

बोलून बातमी शोधा

कोकणात कोरोना नियंत्रणाचा 'दिगशी' फॉर्म्युला हिट
कोकणात कोरोना नियंत्रणाचा 'दिगशी' फॉर्म्युला हिट
sakal_logo
By
एकनाथ पवार

वैभववाडी : आरोग्य विभागाचे सूक्ष्म नियोजन, त्याच नियोजनानुसार आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केलेले प्रभावी काम, त्याला पोलिस, महसूल आणि ग्रामपंचायतीची मिळालेली भक्कम साथ यामुळे कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या दिगशीत अवघ्या २० दिवसांत कोरोनावर नियंत्रण मिळविण्यास प्रशासनाला यश आले आहे. आता या गावात १०३ पैकी एकच रुग्ण सक्रिय असून, आठ दिवसांत एकही अहवाल पॉझिटिव्ह आलेला नाही. त्यामुळे आरोग्य विभागाचा फॉर्म्युला दिगशीत यशस्वी ठरला आहे.

तालुक्‍यातील दिगशी हे अवघ्या ३८३ लोकवस्तीचे गाव एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाचे हॉटस्पॉट बनले. १४ मार्चला या गावात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर त्याच कुटुंबातील आणखी चौघांना कोरोनाची बाधा झाली; परंतु ते सर्व रुग्ण बरे झाले; मात्र त्यानंतर या गावातील तापसरीची चर्चा सुरू झाली. त्यामुळे ७ एप्रिलला तापसरीच्या चार रुग्णांची तपासणी केली. पैकी २ दोन रुग्ण पॉझिटिव्ह आले. त्यामुळे पुन्हा ९ एप्रिलला आणखी ३१ जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले. त्यापैकी १६ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. या प्रकाराने आरोग्य विभागासह संपूर्ण प्रशासन खडबडून जागे झाले.

गावात असलेले तापसरीचे रुग्ण अन्य कोणत्याही साथीचे नसून ते कोरोनाचे असल्याचे स्पष्ट झाले. आरोग्य विभाग, पोलिस प्रशासन, महसूल प्रशासन आणि ग्रामपंचायतीची एकच पळापळ सुरू झाली. आरोग्य विभागाने कोरोनावर नियत्रंण मिळविण्यासाठी सूक्ष्म नियोजनाचा आराखडा तयार केला. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अनिल पवार यांनी आरोग्य विभागाचे पथक तयार केले. यामध्ये डॉ. कीर्ती गायकवाड, डॉ. करण पाटील, आरोग्य सेवक महेंद्र गौरखेड, आरोग्य सेविका एन. डी. कुलकर्णी, आशा स्वयंसेविका वैशाली ईस्वलकर यांचा समावेश होता. ७ एप्रिलपासून यांनी अधिकाऱ्यांनी आखुन दिलेल्या नियोजनाप्रमाणे जीवाची पर्वा न करता कामाला सुरूवात केली.

हेही वाचा: कोकणचा हापूस डायरेक्ट व्हिक्‍टोरिया राणीस; आंतरराष्ट्रीय मार्केट झाले खुले

गावात सर्व्हेक्षण करणे, लोकांची स्वॅब देण्याची मानसिकता तयार करणे, संशयिताचे स्वॅब घेणे ही कामे हे पथक प्रामाणिकपणे करू लागले. गावातील सोलकरवाडी, पवारवाडी, पाष्टेवाडी आणि मोरेवाडी या चारही वाडीतील लोकांच्या घरोघरी जाऊन सर्व्हेक्षणाच्या माध्यमातून विचारपूस करणे, त्यांची तपासणी करण्याचे जोखमीचे काम हे पथक करीत होते. संपुर्ण गावात भीतीचे वातावरण होते. संपूर्ण गाव कंटेन्टमेंट झोन जाहीर करण्यात आला होता. कुणी कुणाकडे जाण्याचा प्रश्नच नव्हता. अशा वातावरणात हे पथक रात्रंदिवस काम करीत होते. ७ एप्रिलपासून २७ एप्रिल या २० दिवसांच्या कालावधीत तब्बल १८५ स्वॅब घेण्याचे काम केले. त्यापैकी १०३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. या सर्व रूग्णांवर सांगुळवाडी कोविड सेंटरमध्ये आणून उपचार करण्यात आले.

"दिगशीत ७ एप्रिलपासून आरोग्य विभागाचे पथक दिवस-रात्र काम करीत आहे. घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणे, रुग्णांची तपासणी करणे आणि महत्त्वाचे म्हणजे लोकांमध्ये स्वॅब देण्याची मानसिकता तयार करण्याचे काम या पथकाने केले. आरोग्य, पोलिस विभाग, महसूल विभाग आणि ग्रामपंचायतीने टीमवर्कने काम केल्यामुळे कोरोनावर नियत्रंण ठेवण्यात यश आले."

- डॉ. अनिल पवार, तालुका आरोग्य अधिकारी, वैभववाडी

गाव कोरोनामुक्तीकडे

आरोग्य विभागाच्या या पथकाने केलेल्या नियोजनबद्ध कामामुळे कोरोनाचा हॉटस्पॉट बनलेल्या दिगशीत गावावर नियंत्रण मिळविणे आरोग्य विभागाला यश आले. आरोग्य विभागाप्रमाणे पोलिस प्रशासन, महसूल प्रशासन, ग्रामपंचायतीनेदेखील महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. आता या गावात कोरोनाचा एकच रुग्ण सक्रिय आहे. येत्या चार-पाच दिवसांत पूर्ण गाव कोरोनामुक्त होईल, अशी अपेक्षा आहे.

हेही वाचा: बदामपासून घरीच तयार होणाऱ्या रेसिपी नक्की ट्राय करा

फॉर्म्युला अनुकरणीय

दिगशी गावात ज्याप्रमाणे आरोग्य विभागाने फॉर्म्युला वापरला त्याचप्रमाणे अन्य गावांतदेखील वापरला तर कोरोनावर नियत्रंण ठेवणे शक्‍य होणार आहे. त्यामुळे दिगशी नियत्रंण पॅटर्न तंतोतंत राबविण्याची गरज आहे.

यंत्रणेवर एक नजर

  • दिगशीची लोकसंख्या अवघी ३८३

  • स्वॅब घेतलेले १८५

  • पॉझिटिव्ह रुग्ण १०३

  • सध्या सक्रिय रुग्ण १

  • घरोघरी तपासणीवर भर

  • दोन डॉक्‍टर, आरोग्य सेवक, सेविका, आशा कार्यरत