सिंधुदुर्ग 31 मार्चपर्यंत बंद

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 मार्च 2020

नागरिकांना गर्दी न करण्याचे व घराबाहेर न पडण्याचे आवाहन वारंवार केले जात आहे.

ओरोस (सिंधुदुर्ग) - कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात अत्यावश्‍यक सेवा वगळून इतर सर्व आस्थापने 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी जारी केले. त्यामुळे रविवारपासून जिल्ह्यातील अतिमहत्त्वाच्या शासकीय-निमशासकीय आस्थापना, बॅंका, रस्ते-रेल्वे वाहतूक, अन्न-भाजीपाला-किराणा पुरविणाऱ्या आस्थापना व दूरध्वनी-इंटरनेट आदी वगळून इतर आस्थापना बंद राहणार आहेत. 

राज्यात कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी शासनस्तरावर सर्व त्या उपाययोजना केल्या जात आहेत. फैलाव होऊ नये म्हणून गर्दी होणारे कार्यक्रम तसेच गर्दीची ठिकाणे बंद करण्याचे आदेश यापूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. नागरिकांना गर्दी न करण्याचे व घराबाहेर न पडण्याचे आवाहन वारंवार केले जात आहे.

तरीही जिल्ह्यातील स्वीट मार्ट, चाट भांडार, पानटपरी या ठिकाणी नागरिकांची गर्दी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याअनुषंगाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांचा भाग म्हणून 21 मार्चच्या मध्यरात्री 12 वाजल्यापासून जिल्ह्यातील सर्व आस्थापना व दुकाने 31 मार्चला रात्री 12 वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. 

सहा रुग्ण आयसोलेशनमध्ये 
कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात सध्या 98 व्यक्तींचे अलगीकरण (क्वारंटाईन) केले आहे. त्यांना अलगीकरण कक्षात ठेवून उपचार केले जात आहेत. तसेच सध्या सहा रुग्ण आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत. या सहाही रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

"ती' दोन्ही सॅम्पल निगेटिव्ह 
परदेशातून आलेल्या दोन संशयितांचे नमुने कोरोना विषाणू तपासणीसाठी पाठविले होते. यातील एक दुबई तर दुसरा अबुधाबी येथून आला होता. या दोन्ही नमुन्यांचे अहवाल जिल्हा आरोग्य यंत्रणेला प्राप्त झाले आहेत. दोघांचेही नमुने निगेटिव्ह आले आहेत. 

गोवामार्गे येणारे विदेशी थेट विलगीकरण कक्षात 
जिल्हा प्रशासनाने पर्यटनासाठी दाखल झालेल्या विदेशी पर्यटकांची शोधमोहीम राबवून त्यांची कोरोना तपासणी पूर्ण केली आहे. 
129 विदेशींची ही तपासणी पूर्ण केल्यानंतर कोरोनाच्या भीतीने गोवामार्गे सिंधुदुर्गात दाखल होणाऱ्या विदेशींना थेट प्रवेशबंदी केली आहे. गोवा राज्याच्या सीमारेषेवरून सिंधुदुर्गात प्रवेश करू इच्छिणाऱ्या विदेशी पर्यटकांना बांदा व दोडामार्ग येथे अडविले जात आहे. या दोन्ही ठिकाणी विलगीकरण कक्ष तयार केले आहेत. कक्षात नियमानुसार त्यांची तपासणी केली जाते. तसेच या कक्षात त्यांची रवानगी केली जात आहे. 

या सेवा सुरू राहणार 
शासकीय, निमशासकीय कार्यालये, पिण्याचे पाणी पुरवठा व सांडपाणी निचरा व्यवस्थापन करणाऱ्या आस्थापना, सर्व बॅंका, दूरध्वनी व इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या आस्थापना, रस्ते व रेल्वे वाहतूक, अन्न, भाजीपाला व किराणा दुकान, दवाखाने, वैद्यकीय केंद्र व औषध दुकाने, विद्युतपुरवठा, ऑईल व पेट्रोलियम व ऊर्जा संसाधने, एलपीजी, घरगुती गॅस पुरवठा करणाऱ्या आस्थापना, प्रसारमाध्यमे, मीडिया, अत्यावश्‍यक सेवा देणाऱ्या आयटी आस्थापना या अत्यावश्‍यक सेवा सुरू राहणार आहेत. या व्यतिरिक्त सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. 
या आदेशाचा भंग करणारी कोणतीही व्यक्ती, संस्था, आस्थापना अथवा समूह, आपत्ती व्यवस्थापन अधिनियमानुसार शिक्षेस पात्र असणार आहे. याची दक्षता घेणार असल्याचे आदेशात जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्या (ता. 22) जनता कर्फ्यू लावत या दिवशी सकाळी 7 ते रात्री 9 या वेळेत घरात थांबण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे मोदी यांच्या आवाहनाला जिल्ह्यातील नागरिकांनी भरघोस प्रतिसाद द्यावा. 
- के. मंजुलक्ष्मी, जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona effect in sindhudurg district