पालकांच्या मनात कोरोनामुळे धास्ती ; अवघी चौदाशेच संमतीपत्रे

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 22 November 2020

जिल्ह्यात ८३ हजार १३६ विद्यार्थी आहेत. एकूण विद्यार्थ्यांच्या तुलनेत ही संख्या नगण्यच आहे.

रत्नागिरी : मुंबई, पुण्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्याचा परिणाम संमतीपत्रांवर झालेला आहे. दोन दिवसांत १९६ शाळांमधील अवघ्या १४०० पालकांनीच संमतीपत्र दिली आहेत. जिल्ह्यात ८३ हजार १३६ विद्यार्थी आहेत. एकूण विद्यार्थ्यांच्या तुलनेत ही संख्या नगण्यच आहे. तरीही सोमवारपासून (२३) शाळा सुरू केल्या जाणार आहेत.

हेही वाचा - मालवण किल्ला मंदिराची पाहणी
 

कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, अप्पर सचिव वंदना कृष्णा यांनी घेतला. या वेळी रत्नागिरीच्या शिक्षणाधिकारी निशादेवी वाघमोडे, उपशिक्षणाधिकारी गोपाळ चौधरी सहभागी होते. रत्नागिरी जिल्ह्यात ९ वी ते १२ वीच्या एकूण ४५८ शाळा आहेत. त्यामध्ये ८३ हजार १३६ विद्यार्थी आहेत. शाळेत येणाऱ्या मुलांसाठी संमतीपत्र आवश्‍यक आहे. 

जिल्ह्यातील अवघ्या १४०० विद्यार्थ्यांच्या पालकांनी संमतीपत्र १९६ शाळांकडे सादर केले आहे. एकूण विद्यार्थ्यांच्या तुलनेत दीड टक्‍केच पालक सकारात्मक आहेत. अनेक पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण असून भीतीही आहे. शाळेत गेल्यानंतर मुलांच्या आरोग्याची जबाबदारी कुणाची, हा प्रश्‍न पालकांकडून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे प्रत्यक्ष शिक्षणापेक्षा ऑनलाइन शिक्षणावरच भर द्यावा लागणार आहे.

शाळेत जाण्यापूर्वी दुर्धर आजार असलेल्या शिक्षकांची आरटीपीसीआर, तर उर्वरित शिक्षकांची अँटिजेन चाचणी केली जात आहे. जिल्ह्यातील पाच हजार ९९० पैकी एक हजार १३० शिक्षकांच्या चाचण्या झाल्या आहेत. जिल्हा परिषद प्रशासनाकडून जास्तीत जास्त चाचण्या करता याव्यात, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सोमवारपर्यंत ५० टक्‍केच शिक्षकांच्या चाचण्या करणे शक्‍य आहे. उर्वरित शिक्षकांना पहिल्या दिवशी शाळेत पोचणे अशक्‍य आहे. पालकांशी सल्लामसलत न करताच रत्नागिरी शहरातील काही शाळांनी परस्पर निर्णय घेतले आहेत. याबाबत पालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्‍त केली जात आहे. याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे.

हेही वाचा -  वैद्यकीय अधिकाऱ्यांना कणकवलीत घेराओ

  तालुका        संमतीपत्र 
 मंडणगड          ८६
 दापोली            ११२
 खेड                २३६
 चिपळूण          २०९ 
 गुहागर            १०४
 संगमेश्‍वर        ३४८
 रत्नागिरी          २००
 लांजा               ४८
 राजापूर            ६५

 

"शासनाच्या निकषानुसार शाळा सुरू करण्यात येणार आहेत. आरोग्याला महत्त्व असल्यामुळे मुलांची गर्दी होणार नाही, यासाठी त्या-त्या शाळांनी नियोजन करावयाचे आहे."

- लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हाधिकारी

 

"पालकांकडून विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्याचा किती प्रतिसाद मिळतो, याची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. पालकांची लेखी संमती मिळण्यासाठी कालावधी लागेल. त्यामुळे टप्प्याटप्प्याने शाळा सुरू होतील. ऑनलाइन शिक्षण सुरू राहील."

- गोपाळ चौधरी, उपशिक्षणाधिकारी

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona fear in parents only 1400 consenter in ratnagiri for school opening