ब्रेकिंग - खासदार विनायक राऊत यांना कोरोनाची बाधा  

सकाळ वृत्तसेवा
Friday, 11 September 2020

खासदार राऊत लवकरच बरे होवून जिल्हावासियांच्या सेवेत पुन्हा रूजू होतील

ओरोस - खासदार विनायक राऊत यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यांच्यावर मुंबईच्या नानावटी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. आपली प्रकृती एकदम ठिक असल्याचे खासदार राऊत यांनी सकाळशी बोलताना सांगितले. खासदार राऊत लवकरच बरे होवून जिल्हावासियांच्या सेवेत पुन्हा रूजू होतील अशी सदिच्छा शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार वैभव नाईक यांनी सांगितले. आमदार वैभव नाईक यांनी याबाबत एक पत्रक काढले आहे.   

 पत्रकात आमदार नाईक यांनी म्हटले आहे की, आमचे मार्गदर्शक, शिवसेना सचिव, सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि आमच्या कुटुंबातील एक सदस्य विनायक राऊत यांची कोरोना चाचणी आज पॉझिटिव्ह आली आहे. हे ऐकून खरोखरच मनाला धक्का बसला. शिवसेनेचे आम्ही सर्वच लोकप्रतिनिधी लोकांच्या सेवेसाठी कार्यरत असताना काळजी घेतली जाते. मात्र हे करत असताना आम्हालाही कोरोनाची लागण होणार याची जाणीव होतीच. परंतु कोरोनाला घाबरून आम्ही घरात न बसता ज्यांनी आपल्याला निवडून दिले त्या जनतेला कोरोनाचा फटका बसू नये यासाठी आमचे प्रयत्न राहिले. नेहमी काळजी घेऊन काम करत असताना नकळतपणे काही दिवसांपूर्वी मी ,शिवसेनेचे अन्य पदाधिकारी नेते व आता खा. राऊत देखील कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.

खा. राऊत साहेबांशी संपर्क साधून चौकशी केली असता त्यांची प्रकृती व्यवस्थित आहे. देव रामेश्वराच्या कृपा आशीर्वादाने व सिंधुदुर्ग जिल्हावासीयांच्या आशीर्वादाने लवकरच ते बरे होऊन पुन्हा  सिंधुदुर्ग रत्नागिरी  वासीयांच्या सेवेत रुजू होतील.अशी जिल्हावासीयांच्या वतीने  प्रार्थना करतो. 

सिंधुदुर्गात आणखीन 75 कोरोनाग्रस्त

जिल्ह्यात आणखी 75 व्यक्तीचे कोरोना अहवाल बाधित आल्याने जिल्ह्याची एकूण बाधित संख्या 2 हजार 249 झाली आहे. जिल्ह्यात आणखी दोघांचा कोरोनाने मृत्यू झाला. आणखी 50 जणांनी कोरोनावर मात केल्याने डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या 1 हजार 153 झाली आहे. 

जिल्ह्यात गुरुवारी दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण कोरोनाबाधित संख्या 2 हजार 174 होती. आज दुपारी 12 वाजेपर्यंत नवीन 336 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात 261 अहवाल निगेटिव्ह आले आहेत, तर 75 अहवाल बाधित आले आहेत. त्यामुळे बाधित संख्या 2 हजार 249 झाली आहे. या सर्व रुग्णावर कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत, अशी माहिती शल्य चिकित्सक डॉ धनंजय चाकुरकर यांनी दिली.

जिल्हा कोरोना चाचणी केंद्राला नव्याने 433 कोरोना तपासणी नमूने प्राप्त झाले आहेत. त्यामुळे कोरोना तपासणीसाठी घेण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या 19 हजार 44 झाली आहे. यातील 18 हजार 669 अहवाल प्राप्त झाले आहेत. यातील 16 हजार 420 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 375 अहवाल प्रतिक्षेत आहेत. 1 हजार 61 रुग्ण सक्रिय आहेत. जिल्ह्यातील संस्थात्मक क्वारंटाईनमधील 7 हजार 826 व्यक्ती कालावधी पूर्ण झाल्याने आज घरी परतल्या. त्यामुळे क्वारंटाईन संख्या 13 हजार 179 राहिली आहे. 45 व्यक्ती घरी गेल्याने गाव पातळीवरील क्वारंटाईन संख्या 8 हजार 652 राहिली आहे. तर नागरी क्षेत्रातील तब्बल 7 हजार 781 व्यक्ती कमी झाल्याने येथील दाखल व्यक्ती 4 हजार 527 राहिली आहे.

हे पण वाचाधक्कादायक : जमिनीच्या हद्दीवरून वाद; विळ्यानेच तोडली तरुणाची बोटे

 

कोरोनामुळे मृतांवर सिंधुदुर्गनगरीत अंत्यसंस्कार

यापुढे कोरोनामुळे मृत्यू झाल्यास त्या व्यक्तीचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार नाही. सिंधुदुर्गनगरी येथील प्राधिकरणच्या असलेल्या स्मशानभूमित त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. यासाठी येणारा खर्च प्राधिकरण निधितून करण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक नियोजन प्राधिकरण समिती अध्यक्ष नियोजन करणार आहेत. यामुळे कोरोना बळी ठरलेल्या नातेवाईकांची होणारी परवड थांबणार आहे, अशी माहिती आज पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. जिल्ह्याचा मृत्यू दर 1.25 आहे. तर रिकव्हरी दर 57 टक्के आहे. मृत्यू दर राज्याच्या तुलनेत कमी आहे. जिल्ह्यात सध्या ऑक्सीजन पुरेसा आहे, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.

हे पण वाचादोन रूग्णालयांच्या निष्काळजीपणात रूग्णाचा गेला प्राण

 

संपादन - धनाजी सुर्वे 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona infection to mp vinayak raut