कोकणवासीय लय भारी...कोरोनाच्या संकटातही गणेशोत्सवाचा आनंद

अजय सावंत
Saturday, 22 August 2020

जिल्ह्यात मार्चपासून आत्तापर्यंत सुमारे दोन लाख चाकरमानी मंडळी दाखल झाले असून उर्वरित चाकरमानी मंडळी गावागावात दाखल होऊ लागले आहे.

कुडाळ (सिंधुदुर्ग) - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव असतानाही यंदा गणेशोत्सवाचा आनंद सर्वत्र ओसंडून वाहत आहे. चाकरमानी दाखल झाले असून शहर बाजारपेठ गेले तीन दिवस गर्दीने फुलून गेली आहे. मुंबई, पुणेसह गोवा राज्यातील चाकरमानी आपल्या गावी आले आहेत. जिल्ह्यात मार्चपासून आत्तापर्यंत सुमारे दोन लाख चाकरमानी मंडळी दाखल झाले असून उर्वरित चाकरमानी मंडळी गावागावात दाखल होऊ लागले आहे.

वाचा - अनाथांच्या नाथा तुज नमो  ; देवरुखात या दहा मुली साजरा करणार दिड दिवसांचा गणेशोत्सव 

सर्वजण गणेशोत्सव शासनाच्या नियमाप्रमाणे साध्या पद्धतीने साजरा करणार आहेत. उद्या (ता.22) लाडक्‍या गणरायाचे आगमन होणार आहे. गणेश उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर गेले दोन तीन महिने तालुक्‍यातील गणेश चित्र शाळामध्ये मूर्ती घडवण्यास कारागिरांनी सुरुवात केली होती. त्यांच्या कामाला आता चांगली गती आली आहे. गणेशोत्सवामुळे गावातील घरांच्या साफसफाईचे रंगरंगोटीचे काम पूर्ण झाले आहे. गणेश मुर्ती शाळेतील कामकाज अखेरच्या टप्प्यात आले आहे.

गणेश चतुर्थीला लागणाऱ्या विविध प्रकारच्या साहित्यांनी जिल्ह्यातील बहुतांशी बाजारपेठा सज्ज झाल्या असून जिल्ह्यात गणेशोत्सवाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. जिल्ह्यात मुंबई, पुणे स्थिती तसेच लगतच्या गोवा, कर्नाटक राज्यातीत अन्य मोठ्या शहरातील चाकरमानी मंडळी चार महिन्यांपूर्वी आपापल्या गावी दाखल झाले असून उर्वरित मंडळी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर दाखल होऊ लागले आहेत.

हेही वााचा - Good News - रत्नागिरीत केंद्राच्या या स्कीमचा हजारो उद्योजकांना फायदा  

चाकरमानी मंडळी बरोबरच गावातील स्थानिक मंडळी देखील उत्सवाच्या तयारीत आहेत. उत्सवासाठी लागणाऱ्या आकर्षक विद्युत रोषणाई माळा, विविध प्रकारचे बल्फ, पर्यावरणपूरक हार-तुरे, फुले, कुंडीतील झाडे, फळे विविध प्रकारचे फटाके, लाडू, मोदक, करंज्या, पंचखाद्य, आकर्षक प्रकारचे मखर, बाप्पाचे आकर्षक पालखीसाठी लागणारे साहित्य, पूजेसाठी लागणारे विविध प्रकारचे साहित्यांनी बाजारपेठेतील दुकाने फुलून गेल्याचे चित्र जवळपास सर्वच बाजारपेठेमध्ये पहावयास मिळत आहे. कोरोना महासंकटाचे निवारण आपला बाप्पाच करणार असल्याने गणेशभक्त कोरोना नियमाच्या अधीन राहून कार्यरत झाले आहेत. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona's effect on Ganeshotsav in Konkan sindhudurg