सावंतवाडी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 मार्च 2020

मोठी शहरे, गजबजलेल्या ठिकाणे आदी भागातील मोठे उत्सव, लग्नसमारंभ, मंदिरे, पर्यटन स्थळे बंद ठेवण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले आहे.

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर बाजार बंद ठेवण्याबाबत प्रशासनाने केलेल्या आवाहनाला शहरातील व्यापाऱ्यांनी प्रतिसाद देत आज कडकडीत बंद पाळला; मात्र ग्रामीण भागात या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. कोरोनाच्या विषाणुचा फैलाव दुर ठेवण्यासाठी राज्याकडून कडक पाऊले उचलली जात आहेत. त्याचा प्रत्यय म्हणून मोठी शहरे, गजबजलेल्या ठिकाणे आदी भागातील मोठे उत्सव, लग्नसमारंभ, मंदिरे, पर्यटन स्थळे बंद ठेवण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले आहे.

प्रशासनांना सहकार्य करताना या उपाययोजनांचे पालन सर्वत्र होत असल्याचे दिसून येत आहे. तालुक्‍यात प्रशासनाच्या उपाययोजनांचे तीव्र गतीने पालन करताना तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी तालुका व्यापारीींघटनेला विश्‍वासात घेऊन आजपासून एक दिवस आड बाजारपेठा बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देताना शहरातील व्यापाऱ्यांनी आज शंभर टक्के आपला व्यवसाय बंद ठेवून कडकडीत बंद पाळला. शिवाय काही दुकानदारांनी आपला व्यवसाय सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला असता, तो बंद करण्यास भाग पाडले. 

शहरात कडकडीत बंद असला तरी ग्रामीण भागात मात्र व्यापाऱ्यांनी या बंदला संमिश्र प्रतिसाद दिला. त्यामुळे ग्रामीण भागातील दळणवळण काही प्रमाणात सुरू होते. शहरातील व्यापारी संघटनेने बरोबरच ग्रामीण भागातून भाजी विक्री येणाऱ्या विक्रेत्यांनीही या बंदमध्ये सहभाग घेतल्याने पालिकेच्या भाजी मंडई बाहेर गर्दी दिसुन येत नव्हती. आज सकाळी बाजारपेठेमध्ये काही प्रमाणात नागरिकांची वर्दळ सोडता दुपारी पूर्णतः सन्नाटा पसरला होता. 

शहरातील मेडिकल, दूध विक्री केंद्र पेट्रोल पंप, बॅंका, एटीएम, आदी अत्यावश्‍यक सेवा सोडून सर्वच व्यापाऱ्यांनी स्वखुशीने बंदमध्ये सहभाग घेतल्याचे प्रकर्षाने दिसून आले आहे. तालुक्‍यातील नाभिक संघटनेनेही या बंदमध्ये सहभाग घेत तालुक्‍यातील केश कर्तनालय बंद ठेवण्याच आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत तालुक्‍यातील केशकर्तनालय बंद ठेवण्यात आली. शहरामध्ये सकाळपासूनच दुकानदाराने बंदमध्ये सहभाग घेतल्याने ग्रामीण भागातून बाजारासाठी आलेल्या काहींना माघारी परतावे लागले.

उद्या (ता.22) संपूर्ण देशात संचार बंदी लागु केली असताना आज काहीजण बाजाराच्या निमित्ताने बाहेर पडले; मात्र शहरात कडकडीत बंद ठेवल्याने त्यांची निराशा झाली; मात्र बाजारपेठेत नागरिकांची रेलचेल होती; मात्र ही रेलचेल दुपार नंतर थंडावली. दुपारी पुर्णतः शुकशुकाट बाजारपेठेत होता. रविवारी बंद असल्याने आणि बाहेर पडता येणार नसल्याने पेट्रोल पंप तसेच एटीएम बाहेर गर्दी होती. 

"ते' दुकान बंद पाडले 
शहरात सोन्याचे दुकान थाटलेल्या एका व्यापाऱ्याकडून आजच्या बंदमध्ये सहभाग न घेता कामगार वर्गाला कामावर बोलावले होते. हा प्रकार काही व्यापाऱ्यांना समजताच त्यांनी त्याला समज दिली; मात्र आपणाला मालकाने दुकान चालु ठेवण्यास सांगितले असे त्याने सुरवातीला सांगितले. त्यानंतर प्रशासनाच्या प्रतिनिधींनी येऊन त्यांना दुकान बंद पाडण्यास भाग पाडले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus effect in Sawantwadi