विनापरवाना हॉटेलमध्ये कॉरंटाईन, स्थानिक आक्रमक

coronavirus impact banda sindhudurg
coronavirus impact banda sindhudurg

बांदा (सिंधुदुर्ग ) - शहरातील खासगी हॉटेलमध्ये पेड क्वारंटाईन झालेला युवक कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या हॉटेलला क्वारंटाईन करण्यासाठी स्थानिक प्रशासनाची परवानगी नसतानाही क्‍वारंटाईनची व्यवस्था केल्याने आज स्थानिक आक्रमक झाले. सरपंच अक्रम खान यांच्यासह स्थानिकांनी हॉटेल प्रशासनाला बांदा पोलिसांच्या समक्षच जाब विचारला. 

बांदा पोलिस निरीक्षक अनिल जाधव व वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील यांनी सकाळीच हॉटेल सील केले. सद्यःस्थितीत हॉटेलमध्ये एकूण 17 व्यक्ती क्वारंटाईन आहेत. प्रशासनाने कंटेन्मेंट झोन जाहीर केल्याने सायंकाळी उशिरा हॉटेल परिसरातील रस्ते तीन ठिकाणी तसेच गवळीटेंबवाडी पूर्णपणे सील केली आहे. 

बांदा शहरात विविध शाळा, महाविद्यालये येथे 300 हून अधिक जणांना संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे. शहरातील दोन खासगी हॉटेलमध्ये पेड क्वारंटाईन करण्यात आले. आज सकाळी कोरोना पॉझिटिव्ह आढळलेला तरुण हा 17 तारखेला हॉटेलमध्ये आला होता. त्याचा स्वॅब तपासणीसाठी घेतला होता. त्याचा अहवाल आज सकाळी पॉझिटिव्ह प्राप्त झाला. शहरातील हा पहिला रुग्ण. या अहवालानंतर शहरात एकच खळबळ उडाली. 

स्थानिक प्रशासनाने याची तातडीने दखल घेतली. पोलिस निरीक्षक अनिल जाधव, बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील, सरपंच अक्रम खान, पोलिस कर्मचारी मनीष शिंदे, दादासो पाटील, विजय जाधव, अमोल बंडगर आदींनी तातडीने धाव घेत हॉटेलचा परिसर सील केला. कोरोना पॉझिटिव्ह तरुणाला आज सायंकाळी उशिरा ओरोस येथे जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. 

संबंधित हॉटेल प्रशासनाने क्वारंटाईन करण्यासाठी स्थानिक प्रशासनाची परवानगी न घेतल्याचा आरोप सरपंच खान यांनी केला. यावेळी भाजपचे माजी शहर अध्यक्ष सिद्धेश पावसकर, संदेश पावसकर, हेमंत दाभोलकर, गुरुनाथ नार्वेकर, बाबलो सावंत यांच्यासह स्थानिक ग्रामस्थांनी घेरावो घालत जाब विचारला. यावेळी पोलिस निरीक्षक अनिल जाधव व स्थानिक ग्रामस्थ यांच्यात बाचाबाची झाली. 

यावेळी हॉटेल चालक यांनी आपल्याकडे 17 रोजी दिलेले सावंतवाडी तहसीलदारांचे विलगीकरणासाठी हॉटेल द्यावे, असे पत्र असल्याचे सांगितले; मात्र हॉटेलमध्ये 12 मे पासूनच क्वारंटाईन केल्याचा आरोप स्थानिकांनी केला. आरोग्य सहायक दत्ताराम म्हापणकर यांनी याठिकाणी बोलावून विचारले असता त्यांनी सांगितले, की आपण 12 रोजीच स्थानिकांनी केलेल्या तक्रारीनुसार याठिकाणी येऊन पाहणी केली असता हॉटेलमध्ये क्वारंटाईन केल्याचे निदर्शनास आले. याठिकाणी कोरोना क्वारंटाईन कक्ष, असा फलक लावावा तसेच याची माहिती स्थानिक प्रशासनाला द्यावी, असे सूचित केले होते असे सांगितले. 

संबंधित पॉझिटिव्ह रुग्ण हॉटेल परिसरात फिरत असल्याचे शेजारील ग्रामस्थांनी सांगितले. जेवण पार्सल घेण्यासाठी सायंकाळी याठिकाणी गर्दी होत असल्याचेही स्थानिकांनी सांगितले. यावेळी स्थानिकांनी हॉटेल चालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. सायंकाळी उशिरा कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या तरुणाच्या भावाला विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. 

"कंटेन्मेंट झोन' 
सायंकाळी उशिरा प्रशासनाने हॉटेल परिसरातील 300 मीटर परिसर "कंटेन्मेंट झोन' जाहीर करण्यात आला आहे. बांदा-वाफोली रस्त्यावर गणपती मंदिर, निमजगा व पाटकर बाग येथे तीन ठिकाणी रस्ता सील करण्यात आला. तसेच गवळीटेंबवाडी पूर्णपणे सील करण्यात आली असून, येथील नागरिकांना या कालावधीत पूर्णपणे अन्नधान्य देण्यात येणार असल्याचे सरपंच खान यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com