स्थानिक चिंतेत...पक्ष कायकर्त्यांत धाकधुक!

राजेश सरकारे
Thursday, 23 July 2020

आमदार वैभव नाईक यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर बिजलीनगरमधील काही भाग आज कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित केला.

कणकवली (सिंधुदुर्ग) - कणकवली शहर आणि परिसरात कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने शहरवासीयांसह राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये धाकधूक वाढली आहे. आज दिवसभरात शहरात तीन तर लगतच्या हळवल आणि कलमठ गावात प्रत्येकी एकाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. तर तालुक्‍यात आतापर्यंत 121 कोरोना रुग्ण आढळले आहेत. 

आमदार वैभव नाईक यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर बिजलीनगरमधील काही भाग आज कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित केला. तर दुपारनंतर बिजलीनगरमध्ये 2, तेलीआळी, हळवल आणि कलमठ मध्ये एकाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. यातील तिघे नाईक यांच्या थेट संपर्कातील आहेत. तर कलमठमधील एक व्यक्‍ती विदेशातून आली आहे. 

वाचा - सीईटीची मार्गदर्शक तत्वे जाहीर, 30-31 ला होणार परीक्षा

कणकवली शहर आणि परिसरातील कोरोनाची साखळी तोडण्यात आरोग्य यंत्रणेला गेल्या महिन्यात यश आले होते. त्यामुळे शहरवासीयांना दिलासा मिळाला होता; मात्र चार दिवसांपूर्वी तेलीआळी येथील एका ज्येष्ठाला कोरोनाची लागण झाली. त्यानंतर त्याच्या कुटुंबातील एका सदस्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर आमदार नाईक यांचा स्वीय सहायक आणि त्यांच्या कुटुंबातील अन्य दोन सदस्यांनाही लागण झाल्याचे स्पष्ट झाले. 

हेही वाचा - वैभव नाईक : तत्काळ होम क्वारंटाइन व्हा ,प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा...

दरम्यान, पाच दिवसांपूर्वी पालकमंत्री उदय सामंत यांनी नरडवे धरण, भालचंद्र आश्रम, आचरेकर प्रतिष्ठान आणि बस स्थानकाला भेटी दिल्या होत्या. त्यांच्यासोबत आमदार वैभव नाईक यांच्यासह शिवसेनेचे अनेक नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यातील अनेकांशी वैभव नाईक यांचा थेट संपर्क आला होता. त्यामुळे कोरोनाची व्याप्ती वाढण्याचीही शक्‍यता व्यक्‍त होत आहे. नाईक यांच्या अतिनिकटच्या संपर्कात 30 व्यक्‍ती आल्याची माहिती आरोग्य यंत्रणेने दिली होती. यातील दहा जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. तर चौघांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. नाईक यांच्या सपर्कातील आणखी काही जणांचे स्वॅब नमुने आज घेतले. त्यांचे अहवाल उद्या (ता.23) येणार आहेत. 

संपादन ः राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus impact kankavli sindhudurg district