पोरहो...रडायच नाही, लढायचय! टोकाच पाऊल उचलण्याआधी `हे` वाचाच...

coronavirus impact sindhudurg district
coronavirus impact sindhudurg district

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - "तो' आलाय अगदी जगभरात. तो कुठेतरी गाठणारच. कधी प्रत्यक्ष तर अप्रत्यक्ष; पण जग थांबलेल नाही. आपणही नाही थांबायच. कोरोनाच हे आक्रमण परतवून लावायचय; पण नुसत म्हणून नाही. सिंधुदुर्गात अप्रत्यक्षरित्या कोरोना इफेक्‍ट दिसू लागले आहेत. नैराश्‍य वाढत आहे. गेल्या पंधरावड्यात जिल्ह्यात तरुण पोरांच्या आत्महत्या, आकस्मिक मृत्यू याचे प्रमाण चिंताजनकरित्या वाढत आहे. ही बाब दुर्लक्षून चालणार नाही. प्रत्येक केसनुसार यावर मार्ग काढण्याची गरज निर्माण झाली आहे. 

कोरोना हा शब्द आता विश्‍वव्यापी बसलाय. सिंधुदुर्गही त्याला अपवाद नाही; रूग्णसंख्या तुलनेत कमी असली तरी तो कसलाच भेदभाव मानत नाही. पोलिस, ट्रक चालकापासून अगदी थेट आमदार वैभव नाईक यांनाही त्याने गाठलय. तुम्हा-आम्हालाही तो कोणत्यातरी वळणावर गाठणार. मग तो प्रत्यक्ष असेल नाही तर त्याच्या प्रभावाने निर्माण झालेल्या विचित्र स्थितीच्या परिणामामुळे. सिंधुदुर्गात कोरोना रिकव्हरी रेट राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा असला तरी कोरोना इफेक्‍ट मात्र गडद होवू लागला आहे. दुर्दैवाने याकडे तितक्‍या गांभीर्याने पाहिले जात नाही. 

जिल्ह्यात पंधरावड्यात तरुण मुलांच्या आत्महत्यांच्या घटना अचानक वाढल्या. काही मुलांचे आकस्मिक मृत्यू झाले. नैराश्‍य आलेले कितीतरी प्रकार अजुन दबलेलेच आहेत. या प्रत्येक घटनेमागची कारणे वेगवेगळी सांगितली जात आहेत; पण बरेच जण लॉकडाउननंतर जॉबलेस झालेले किंवा आर्थिक मंदित अडकल्याचा कॉमन दुवा यात आहे, ही चिंताजनक बाब आहे. 
सिंधुदुर्गाच्या अंतरंगाचा कानोसा घेतला तर प्रचंड अस्वस्थता आहे.

लॉकडाउनमुळे सव्वा ते दीड लाख मुंबईकर जिल्ह्यात आले आहेत. यातील बऱ्याच तरुण मुलांकडे पुन्हा मुंबईत जायचे तर नोकरी मिळेल का हा प्रश्‍न आहे. ते इथेच काहीतरी रोजगार मिळेल का याची चाचपणी करताहेत; पण इथले मर्यादित स्त्रोत त्यांना तितकेसे परवडणारे नाहीत. अनेक जण अगदी मजुरीपर्यंतचा पर्यायही स्वीकारताहेत; पण तो दीर्घकालीन नसल्याने त्यांच्यातही नैराश्‍याची भावना आहे. 

सगळ्यात मोठा प्रश्‍न गोव्यात नोकरीला असणाऱ्या व आता लॉकडाऊनमुळे जॉबलेस झालेल्यांसमोर आहे. मुळात मुंबईत राहण्याच्या सुविधेचा अभाव, मुळ घरी त्यांची असलेली गरज अशा कारनामुळे जावू न शकणाऱ्या बहुसंख्य तरुणांनी गोव्यात नोकरीचा पर्याय स्वीकारला होता. त्यांच्या कुटुंब चालवण्याच्या अर्थकारणाचा पॅटर्नही ठरला होता.

गोव्यात 10 ते 15 हजाराची नोकरी मिळते. यातले बहुसंख्य अगदी 100 किलोमीटरपर्यंत ये-जा करून नोकरी करायचे. प्रवासाला 4-5 हजार गेले तरी दहा हजार रहायचे. मग वर्षाला यातून लाख-सव्वा लाख आणि घरच्या काजू किंवा इतर शेतीमातीतून 50-60 हजार मिळायचे. यावर घर व्यवस्थीत चालायचे. गोव्यातला जॉब जाण्याबरोबरच यंदा काजूचे दरही गडगडले. यामुळे कित्येक कुटुंबांचे अर्थकारण कोसळले. 

गोव्यात पुन्हा जॉब निर्माण होण्यासाठी "मार्केट अप' होण्याची वाट पहावी लागणार आहे. याचा कोणताच निश्‍चित कालावधी नाही. यामुळे कुटुंबाविषयीची काळजी अनेकांच्या मनात घर करत आहे. या हतबलतेतून नैराश्‍याची लाट तर निर्माण होणार नाही ना? ही भीती आहे. जॉबलेस होण्याची कारणे तीन प्रकारची आहेत. एका प्रकारात नोकरी आहे; पण गोव्यात रहायला दिले जात नाही. दुसऱ्यात लॉकडाऊनमुळे ये-जा करता येत नाही आणि तिसऱ्या प्रकारात नोकऱ्याच गेल्या आणि त्या परत लवकर मिळण्याची शक्‍यता फार कमी आहे. 

प्रशासन का गप्प? 
नैराश्‍य तर सगळीकडेच आहे; पण म्हणून, जग थांबलेल नाही. लढतो तोच शेवटी विजयाची आशा ठेवून असतो. हे संकट एकट्यावर नाही त्यामुळे यातून लढून बाहेर पडण्यासाठी अशा तरुणांना धीर देण्याची गरज आहे. केवळ धीर नाही तर रोजगाराचे मार्ग दाखवणेही गरजेचे आहे. हे करत असताना कॉमन उपाय चालणार नाही. कारण प्रत्येकाचे प्रश्‍न, त्याचे स्वरूप वेगळे आहे. नैराश्‍येत अडकलेल्यांचे प्रश्‍न समजून मार्ग काढायला हवेत. सध्यस्थितीत हा प्रश्‍न शासन आणि प्रशासनाच्या गावीही नाही. त्यांनी याकडे गांभीर्याने पाहणे आवश्‍यक आहे. 

"तरुणांची आत्महत्या' हा माझ्या अभ्यासाचा विषय होता. यात "जॉबलेस' हे या मागचे मुख्य कारण असल्याचा निष्कर्ष निघाला होता. जॉबलेस झाल्याने मुल आत्महत्येसारखे पाऊल उचलतात. सिंधुदुर्गात "टॉन्टींग' फार होते. "तू बसून खातोस', "भुईला भार झालास', असे कर्त्या माणसांकडून सुनावले जाते. ही बाब धोकादायक आहे. वडीलधाऱ्यांनी मुलांना आधार देण्याची गरज आहे. तातडीने मोठ्या प्रमाणात जॉब निर्माण करणे आणि नोकरीबाबत सुरक्षेचे वातावरण तयार करणे हा यावरचा उपाय आहे. शासनाने याकडे गांभीर्याने पाहायला हवे.'' 
- डॉ. कौस्तुभ लेले, मानसोपचार तज्ज्ञ 

जॉबलेस झाल्याने सिंधुदुर्गात निर्माण झालेली अस्वस्थता प्रचंड आहे. आम्ही "एनजीओ' म्हणून यावर काम करतोय आणि हे प्रश्‍न सोडवण्याचा प्रयत्न करतोय; पण यावर एकच कॉमन उपाय, उत्तर नाही. प्रत्येक केसनुसार याची उत्तरे शोधली पाहिजेत. 
- योगेश प्रभू, व्यवस्थापक, लुपिन फाऊंडेशन 

संपादन ः राहुल पाटील
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com