esakal | चिंताजनक! संख्या घटली पण मृतात होतेय वाढ
sakal

बोलून बातमी शोधा

covid 19

चिंताजनक! संख्या घटली पण मृतात होतेय वाढ

sakal_logo
By
राजेश कळंबटटे

रत्नागिरी : सोमवारी कोरोना बाधितांची संख्या निम्म्याने घटली असून चोविस तासात 259 रुग्ण सापडले. हा कडक संचार बंदीचा परिणाम असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. बाधितांची संख्या घटली तरी तिन दिवसात कोरोनाने 15 जणं मृत पावले आहेत.आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार एकुण बाधितांमध्ये आरटीपीसीआर चाचणीतील 148 तर अँटीजेनमधील 111 रुग्णांचा समावेश आहे.

रत्नागिरीत 53, दापोली 43, खेड 22, गुहागर 4, चिपळूण 63, संगमेश्‍वर 54, लांजा 5, राजापूर 15 रुग्ण आहेत. मंडणगडमध्ये एकही रुग्ण सापडलेला नाही. जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या 15 हजार 889 वर पोचली. गेल्या काही दिवसात बाधित रुग्णांचा आकडा उच्चांक गाठत होता. तिन दिवसात पाचशेपेक्षा अधिक रुग्ण आढळले. वाढणारे रुग्ण चिंतेचा विषय बनला होता. कोविड सेंटरमध्येही बेडस् मिळणे अशक्य झाले होते.

हेही वाचा- रत्नागिरीत 569 वाहनांवर कारवाई; 2 हजार 550 जणांची तपासणी 86 जणांकडुन 45 हजाराचा दंड

गंभीर रुग्णांवर उपचार करताना आरोग्य यंत्रणेची तारांबळ उडत होती. यासाठी जिल्ह्यात कठोर निर्बंध घातले. मेडिकल वगळता अन्य अत्यावश्यक सेवा बंद केल्या. कसुन अंमलबजावणी केली असून परजिल्ह्यातून येणार्‍यांना करोना चाचणी अत्यावश्यक केली होती. निर्बंधांची अंमलबजावणी योग्य पध्दतीने झाल्याने बाधितांचा आकडा कमी झाल्याचा अंदाज बांधला जात आहे. मागील सहा दिवसातील ही सर्वात कमी नोंद आहे.

वाढते मृत्यू हे आव्हान बनले आहे. 17 ते 19 एप्रिल या तिन दिवसातील 17 मृतांची नोंद सोमवारी झाली. त्यात सर्वाधिक सात जणं खेड तालुक्यातील आहेत.गुहागर 3, रत्नागिरी 4, चिपळूण 1, राजापूर 1 रुग्णाचा मृत झाला. वयोवृध्द, प्रौढांबरोबर 25 ते 40 वयोगटातील तिन तरुणांचा मृत्यू ही चिंतेची बाब आहे. एकुण मृतांची संख्या 464 झाली असून मृत्यू दर 2.92 टक्के आहे. बाधितांचा दर 12.16 टक्के असून बरे होण्याचा दर 76.91 टक्के आहे.

होम आयसोलेशन वाल्यांवर करडी नजर

नागरिकांना संशयित लक्षणे, पॉझिटीव्हच्या सान्निध्यात आल्यास, परजिल्ह्यातील प्रवास असलेले यांनी कोरोना चाचणी करुन घेणे आवश्यक आहे. लक्षणे नसलेल्या परंतु बाधित असलेल्या व्यक्तीला होम आयसोलेशन केले जाते. त्याचा कालावधी 17 दिवसांचा आहे. या कालावधीत ती घराबाहेर फिरताना आढळून आल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. तसेच वारंवार विनाकारण फिरणार्‍यांवरही गुन्हा दाखल केला जाईल.

Edited By- Archana Banage