esakal | चिंताजनक! मृतदेह गावी नेण्यासाठी पाच तासांचे वेटिंग

बोलून बातमी शोधा

चिंताजनक! मृतदेह गावी नेण्यासाठी पाच तासांचे वेटिंग
चिंताजनक! मृतदेह गावी नेण्यासाठी पाच तासांचे वेटिंग
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

गुहागर (रत्नागिरी) : येथील ग्रामीण रुग्णालयात कोरोनाग्रस्त वृद्धाचा मृत्यू झाला. मृतदेह ताब्यात घेण्यासाठी ग्रामस्थ आले. परंतु, शववाहिनी नसल्याने पाच तास प्रतीक्षा करावी लागली. ग्रामीण रुग्णालयासमोर उभी असलेली रुग्णवाहिका तांत्रिक कारणांमुळे मृतदेह नेण्यासाठी वापरण्यास प्रशासनाने नकार दिला. काल (ता. 19) सायंकाळी उशिरा हा प्रकार घडला.

तालुक्‍यातील त्रिशुळसाखरीमधील कासार नावाच्या वृद्ध दांपत्याला कोरोना झाला. पती-पत्नी गुहागरमधील डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये उपचार घेत होते. या उपचारांमध्ये 15 एप्रिलला महिलेचे निधन झाले; तर 19 एप्रिलला सकाळी अकराच्या सुमारास कासार आजोबांनीही अंतिम श्वास घेतला. मृतदेह ताब्यात घेण्यासाठी सरपंच सचिन म्हसकर यांच्यासह ग्रामस्थांनी गुहागर ग्रामीण रुग्णालय गाठले. शववाहिनी आणल्याशिवाय मृतदेह ताब्यात मिळणार नाही, असे जणू आदेशच व्यवस्थापनाने दिले.

"हेही वाचा- हापूस' हवाय! मागवा आता ऑनलाईन; नोंदणीसाठी 'या; बेबसाईटचा करा वापर

गुहागर तालुक्‍यात शववाहिनी नाही, हे ग्रामीण रुग्णालय प्रशासनाला माहिती आहे. तरीही असे सांगण्यामागचे कारण ग्रामस्थांना कळले नाही. कायद्याप्रमाणे रुग्णवाहिकेतून मृतदेहाची वाहतूक करता येत नाही. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयाने रुग्णवाहिका देण्यास नकार दिला होता. शृंगारतळीतून खासगी रुग्णवाहिकेसाठी संपर्क साधला गेला तेव्हा सदर रुग्णवाहिका एका रुग्णाला चिपळूणला सोडण्यासाठी गेल्याचे समोर आले. ती रुग्णवाहिका शृंगारतळीला आल्यावर गुहागर ग्रामीण रुग्णालयात आली. तोपर्यंत दुपारचे चार वाजले होते.

पाच तास कोरोनाग्रस्त रुग्णाच्या मृतदेहासह ग्रामीण रुग्णालयात नातेवाईक प्रतीक्षा करीत होते. अखेर ग्रामस्थांनी चारला आलेल्या खासगी शववाहिकेतून मृतदेह गावात नेला. तेव्हा गावात सकाळपासून अंत्यसंस्कारांसाठी जमलेल्या लोकांनी निःश्वास सोडला. कोविडच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे गावकऱ्यांनी अंत्यसंस्कार केले.

प्रशासकीय स्तरावर चर्चा

गुहागर तालुक्‍यात शववाहिनी नसल्याने रत्नागिरी गॅस आणि वीज प्रकल्पाने आपल्या सामाजिक दायित्व निधीतून शववाहिनी द्यावी, अशी मागणी तहसीलदार लता धोत्रे यांनी कंपनी व्यवस्थापनाकडे केली आहे. शववाहिनीसाठी शासनाकडून निधी मिळतो का? तालुक्‍यासाठी हक्काची शववाहिनी येईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात भाड्याने शववाहिनी उपलब्ध होऊ शकते का? यासाठी प्रशासकीय स्तरावर चर्चा सुरू असल्याची माहिती तहसीलदार धोत्रे यांनी दिली.

Edited By- Archana Banage