esakal | चिंता कर्जाचे हप्ते भरण्याची : आशा पर्यटनाला दिवाळी बूस्टरची
sakal

बोलून बातमी शोधा

covid impact tourism professionals story ratnagiri

कर्जाचे हप्ते थकले; सुविधांवरील खर्च सुरूच, हॉटेलसह २२ व्यवसाय झाले ठप्प

चिंता कर्जाचे हप्ते भरण्याची : आशा पर्यटनाला दिवाळी बूस्टरची

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

राजापूर (रत्नागिरी) : गेल्या सहा महिन्यांपासून तालुक्‍यातील पर्यटन ठप्प झाले आहे. उन्हाळा-पावसाळा काळातील पर्यटन व्यवसायाला लाखोंच्या नुकसानाची झळ पोचली आहे. अनेक व्यावसायिकांचे बॅंकांच्या कर्जाचे हप्ते थकले आहेत. लॉजिंगसह पर्यटनस्थळांच्या ठिकाणी उभारलेल्या सोयीसुविधांच्या देखभालीसाठी, कर्जाचे हप्ते भरण्यासाठी पैसा आणायचा कुठून, या विवंचनेतील पर्यटन व्यावसायिकांना कोरोनाच्या महामारीमध्येही दिवाळीतील पर्यटन बूस्टरची आशा आहे.  

तालुक्‍याच्या पश्‍चिम भागाला मोठी सागरी किनारपट्टी लाभली आहे. या व्यतिरिक्त कोकणच्या निसर्ग सौंदर्याचाही वारसाही लाभला आहे. या साऱ्याचा आनंद लुटण्यासाठी दरवर्षी सागरी किनारपट्टी भागामध्ये मोठ्या संख्येने पर्यटक येतात.

हेही वाचा- नाॅन स्टॅाप चोविस तास : जिद्दी अभियंत्यांनी एक महिन्यात पेडणे बोगद्यात दाखवला अविष्कार -


गेल्या काही वर्षामध्ये गणेश ॲग्रो टुरीझम, वेत्ये, आंबोळगड बीच, कशेळी येथील बीचवर ग्रामपंचायतीने विकसित केलेला ‘सनसेट पॉईंट’, कोकणातील एकमेव असलेले कशेळीतील सूर्यमंदिर, आडिवरे येथील महाकाली मंदिर, 
धुतपापेश्‍वर मंदिर, दत्तमंदिर व मृडानी नदीवरील धबधबा, चुनाकोळवण येथील सवतकडा-परिटकडा, ओझर येथील शर्लिंन मोंटा यासह पावसाळ्यामध्ये वाहणारे विविध भागातील धबधबे पर्यटकांची पसंती आहे. हॉटेल व्यवसायासह २२ व्यवसायातून लाखो रुपयांची उलाढाल होते. एप्रिल-मे महिन्यातील आगाऊ बुकिंग रद्द झाले. 

लाखोंचे नुकसान झाले. कामगारांसह पर्यटनस्थळाच्या सुशोभीकरणासाठी केलेल्या आगाऊ खर्चाचे नियोजन कसे करायचे? बॅंकांचे हप्ते भरायचे कसे? दिवाळीमध्ये पर्यटन व्यवसाय सुरू होण्याची आशा आहे.
गणेश रानडे, गणेश ॲग्रो टुरीझम, नाटे

संपादन - अर्चना बनगे

loading image