esakal | नंबर आला तरी लस मिळेना; नियोजनाअभावी केंद्रांवर नागरिकांची फरफट
sakal

बोलून बातमी शोधा

नंबर आला तरी लस मिळेना; नियोजनाअभावी केंद्रांवर नागरिकांची फरफट

नंबर आला तरी लस मिळेना; नियोजनाअभावी केंद्रांवर नागरिकांची फरफट

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : शहरात लसीकरण केंद्रांवर (covid 19 vaccine center) नागरिकांची फरफट सुरू आहे. केंद्रावरील कर्मचाऱ्यांची वागणूक अतिशय उद्धट असल्याने नागरिकांचा संताप वाढत आहे. ४५ वर्षांवरील नागरिकांची ऑनलाइन नोंद (online registration) होत नाही. १८ ते ४४ वयोगटातील (18 to 44 age group) लोकांची ऑनलाइन नोंद होते. शेड्यूल येऊनही त्यांना डोस मिळत नाही. नागरिक रणरणत्या उन्हात तासन्‌तास उभे राहतात आणि नंबर आला की लस नाही, म्हणून सांगितले जाते. असा अनुभव येथील मेस्त्री हायस्कूलसह अन्य केंद्रांवर येत असून नागरिकांच्या तक्रारी वाढत आहेत.

कोरोनाचा विळखा घट्ट होत चालला आहे. संसर्ग वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. जास्तीत जास्त लवकर आपण लसीकरण करून घेतले पाहिजे, अशी सर्वांची धरणा झाली आहे. लसीचा तुटवडा (vaccine rare) असल्याने जिल्हा प्रशासनाने ऑनलाइन नोंदणी करा. नोंदणी झाल्यानतंर आपल्याला येणाऱ्या शेड्यूलनुसार तारीख, वेळ आणि केंद्राचे नाव दिले जाईल, तेव्हा लसीकरणासाठी या. विनाकारण गर्दी करू नका, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

हेही वाचा: अनिल परबांचे दापोलीतील व्यवहार ; किरीट सोमय्या करणार गौप्यस्फोट

काल (५) लस उपलब्ध झाल्यामुळे लसीकरणाबाबतचे वेळापत्रकही (timetable) प्रशासनाने जाहीर केले. त्यानुसार आज ठिकठिकाणी लसीकरण सुरू आहे. १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी मेस्त्री हायस्कूलमध्ये लसीकरण सुरू आहे. ऑनलाइन नोंदणी झाल्यानंतर शेड्यूल येते. परंतु, त्यांनाही केंद्रावर लस दिली जात नाही. त्यामुळे नागरिक संतापले आहेत. लस मिळण्यासाठी दोन ते अडीच तास रणरणत्या उन्हात उभे राहून नंबर आला की लस मिळणार नाही, असे केंद्रावर सांगितले जाते. यामुळे नागरिकांचा राग अनावर होऊन वादविवाद होऊ लागले आहेत.

एक नजर...

  • वय वर्षे ४५ वरील नागरिकांची ऑनलाइन नोंद होत नाही

  • वय वर्षे १८ ते ४४ या गटातील लोकांचीच नोंद होते

  • दोन ते अडीच तास रणरणत्या उन्हात नागरिक उभे

  • नंबर आला की लस मिळणार नाही, असे सांगितले जाते

मंडपाबाबत जिल्हाधिकाऱ्यांना (ratnagiri collector) सांगा

भाजपचे रत्नागिरी तालुकाध्यक्ष सुशांत ऊर्फ मुन्ना चवंडे यांनी या केंद्राला भेट दिली. त्यांनी हा सर्व गोंधळ पाहिला. केंद्रप्रमुखांना विचारणा केली असता, त्यांनी उद्धट उत्तरे दिली. उन्हाचा त्रास होऊ नये, म्हणून मंडप घालण्याबाबत केंद्राच्या अधिकाऱ्यांना सांगितले; तर त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगा, असे उद्धट उत्तर दिल्याचे चवंडे यांनी सांगितले.

हेही वाचा: जर्मनीचं कोरोनाविरोधी लढाईचं सूत्र; 'सेव्हन डे इन्सिडन्स'

त्यांनाही लस नाकारली जाते

वय वर्षे ४५ वरील नागरिकांमध्ये फ्रंटलाईन वर्कस्‌ आणि काही ज्येष्ठ नागरिकांना स्पॉटवर नोंदणी करून लस द्यायची आहे. मात्र, त्यांनाही लस नाकारली जात आहे, अशी तक्रार आहे. त्यामुळे केंद्रांवर लसीकरणावरून गोंधळ सुरू आहे. यात प्रशासनाने लक्ष घालून सुसूत्रता आणावी, अशी मागणी होत आहे.