esakal | मुंबई-गोवा हायवेवर 1 कोटी 60 लाखाची दारू जप्त

बोलून बातमी शोधा

मुंबई-गोवा हायवेवर 1 कोटी 60 लाखाची दारू जप्त
मुंबई-गोवा हायवेवर 1 कोटी 60 लाखाची दारू जप्त
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

लांजा : राज्य उत्पादन शुल्क विभाग लांजाने राजापूर तालुक्‍यातील वाटूळ येथील ओव्हर ब्रिजवर केलेल्या कारवाईत कंटेनरमधील गोवा बनावटीचा दारूसाठा जप्त करण्यात आला. बुधवारी सायंकाळी मुंबई-गोवा महामार्गावर केलेल्या कारवाईत एकूण 1 कोटी 72 लाख 85 हजार रुपयांचा मद्यसाठा आणि मुद्देमाल जप्त केला आहे.

लांजा येथील उत्पादन शुल्क विभागाला कंटेनरमधून गोवा बनावटीच्या दारूची विक्री होत असल्याची खबर मिळाली होती. यानुसार बुधवारी राज्य उत्पादन शुल्क विभाग रत्नागिरी अधीक्षक डी. बी. एच. तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली लांजा येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केली. अधीक्षकांसह मार्गावरून गस्त घालत असताना बुधवारी सायंकाळी कंटेनर (एमएच 12 एलटी- 7835) संशयास्पदरित्या आढळून आल्यानंतर हा कंटेनर थांबवला. त्याची तपासणी केली असता, या संपूर्ण कंटेनरमध्ये हा गोवा बनावटीच्या दारूने भरलेला आढळून आला.

हेही वाचा: लस घ्यायची आहे! पाहिला डोस, दुसरा डोस घेताना ही घ्या दक्षता

या कंटेनरमध्ये रॉयल ब्ल्यू माल्ट व्हिस्कीच्या 180 मिलीच्या एका बॉक्‍समध्ये 48 याप्रमाणे अठराशे बॉक्‍समध्ये 86 हजार 400 सीलबंद बाटल्या जप्त केल्या. त्याची एकूण अंदाजे किंमत 1 कोटी 29 लाख 60 हजार रुपये आहे. रॉयल ब्ल्यू माल्ट व्हिस्कीच्या 750 मिलीच्या एका बॉक्‍समध्ये बारा याप्रमाणे चारशे बॉक्‍समध्ये 4800 सीलबंद बाटल्याही जप्त केल्या. याची किंमत 31 लाख 20 हजार रुपये आहे. या दारू वाहतुकीसाठी वापरलेल्या कंटेनरची किंमत बारा लाख रुपये तसेच पाच हजार रुपये किमतीचा मोबाइल असा एकूण एक कोटी 72 लाख 85 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभाग लांजाचे निरीक्षक सुधीर भागवत, दुय्यम निरीक्षक संदीप विटेकर, वाहनचालक ओमकार कांबळे, जवान तसेच मदतनीस म्हणून जगदीश गोरड, विनय माने, रोहित देसाई, साजी शहा यांनी सहकार्य केले. याबाबत अधिक तपास दुय्यम निरीक्षक अमित पाडळकर हे करत आहेत. ट्रकचालक मोहम्मद अब्दुल इझाक (वय 47, रा. मोहम्मद फरहान अहमदनगर शिरवा गुलु ,कासारागोड, केरळ) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा: सिंधुदुर्गात 1 मेपासून रेशन दुकाने बंद

सर्वात मोठी कारवाई

दरम्यान, 1 कोटी 72 लाख 85 हजार रुपयाची करण्यात आलेली कारवाई ही मुंबई-गोवा महामार्गावरची लांजा-राजापूर तालुक्‍यातील ही सर्वात मोठी कारवाई ठरली आहे. या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये गुन्हा दाखल केला आहे.