esakal | गुरे चारण्यासाठी गेलेल्या महिलेच्या अंगावर वीज पडून जागीच मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

गुरे चारण्यासाठी गेलेल्या महिलेच्या अंगावर वीज पडून जागीच मृत्यू

परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे करुळ घाटात दरड कोसळली.

गुरे चारण्यासाठी गेलेल्या महिलेच्या अंगावर वीज पडून जागीच मृत्यू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वैभववाडी : विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह जिल्ह्याच्या काही भागाला मुसळधार पावसाने झोडपून काढले. गुरे चारण्यासाठी गेलेल्या आर्चिणे येथील लक्ष्मी ऊर्फ राजश्री राजाराम शिंगाडे (वय ४२) यांचा वीज अंगावर पडून जागीच मृत्यू झाला. दरम्यान, घाट परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे करुळ घाटात दरड कोसळली. त्यामुळे तळेरे-कोल्हापूर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली.

वैभववाडी-फोंडा मार्गावरील आर्चिणे पिंपळवाडी येथे रस्त्यावर झाड कोसळल्यामुळे वाहतूक दीड तास ठप्प होती. वैभववाडी-सोनाळी मार्गावर मोठे झाड कोसळल्यामुळे तेथेही सायकांळी उशिरापर्यंत वाहतूक ठप्प होती. सायंकाळी तालुक्यातील वीजपुरवठा खंडित झाला होता. जिल्ह्याच्या काही भागांत वादळी वाऱ्याचा फटका बसला आहे.

हेही वाचा: कोल्हापूर पुन्हा हादरलं! कागलनंतर कापशीत 7 वर्षीय मुलाचा नरबळी

जिल्ह्यात सकाळपासून वाढता उष्म्या होता. अंगाची लाही लाही होत होती. दुपारनंतर सह्याद्री पट्टयात काळोख होण्यास सुरवात झाली. चारच्या सुमारास विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरवात झाली. जिल्ह्याच्या बहुतांशी भागात जोरदार पाऊस पडू लागला. वैभववाडी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी यासह अन्य भागांत वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस झाला. दरम्यान, आर्चिणे येथील लक्ष्मी शिंगाडे गुरे घेऊन गेल्या होत्या. अचानक विजांचा कडकडाट होऊ लागल्यामुळे त्या गुरे घेऊन घरी परत येत होत्या. याचवेळी त्यांच्या अंगावर वीज कोसळली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

पावसाचा सर्वाधिक तडाखा वैभववाडी तालुक्याला बसला. घाट परिसरात अधिक जोर होता. करुळ घाटात दरड कोसळली. दरडीमुळे तळेरे-कोल्हापूर मार्गावरील वाहतूक ठप्प आहे. पोलिसांनी वैभववाडीत बॅरिकेड्‌स लावून वाहतूक थांबविली आहे. वादळी वाऱ्यांमुळे वैभववाडी-फोंडा मार्गावरील आर्चिणे पिपंळवाडी येथे रस्त्यावर झाड कोसळले. रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा होत्या.

स्थानिक ग्रामस्थ समाधान दर्डे यांनी झाड कापून रस्ता वाहतुकीस खुला केला. माहिती देऊनही बांधकाम विभागाला कुणीही अधिकारी घटनास्थळी पोहोचला नाही. वैभववाडी-उंबर्डे मार्गावरील सोनाळीत मोठे झाड रस्त्यावर कोसळले. त्यामुळे सायंकाळी उशिरापर्यंत मोठ्या प्रमाणात वाहने अडकली होती. वैभववाडीत तास दीड तास जोरदार पाऊस झाला. त्यामुळे नद्यांच्या पाणीपातळीतदेखील काही अंशी वाढ झाली होती. सह्याद्री पट्टयात पावसाचा जोर अधिक होता. वैभववाडीप्रमाणे कणकवली, कुडाळ, सावंतवाडी तालुक्यांमध्ये विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पाऊस झाला. त्याने जनजीवन विस्कळीत झाले. काही भागांत वादळीवारेदेखील वाहत होते. त्यामुळे झाडांची किरकोळ पडझडदेखील झाली.

हेही वाचा: खळबळजनक! म्हाप्रळ खाडीत दिसले सशस्त्र अतिरेकी?

भातशेती संकटात

जिल्ह्यातील २५ ते ३० टक्के भातशेती परिपक्व झाली आहे. अशा स्थितीत वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळे भातशेती संकटात सापडली असून, शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

loading image
go to top