मडुऱ्यात गव्यानंतर आता मगर मृत 

Crocodile Death In Madura In Sindhudurg Marathi News
Crocodile Death In Madura In Sindhudurg Marathi News

बांदा (सिंधुदुर्ग) - मडुरा - उपराळ येथे दोन गवे मृत झाल्याच्या घटनेस 24 तास न उलटताच आज मडुरा - मोरकेवाडी येथे नदीत महाकाय मगर मृतावस्थेत आढळली. या परिसरात दुर्गंधी येत असल्याने शेतकऱ्यांनी पाहिले असता सहा फुटी मगर मृतावस्थेत पाण्यात तरंगताना दिसून आली. ही मगर दोन ते तीन दिवसांपूर्वी मृत झाल्याचा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला. 

मडुरा पशुवैद्यकीय अधिकारी अनिल साळगावकर यांनी मृत मगरीचे विच्छेदन केले. वनविभाग व ग्रामस्थांनी त्या मगरीवर अंतिम संस्कार केले. 

मडुरा परिसरात मगरींची संख्या मोठ्याप्रमाणात असून त्यांचा उपद्रव वाढत आहे. नदीच्या बाजूलाच शेतकऱ्यांनी मिरची, चवळी, मका, भुईमूग आदी पिकांची शेती केली आहे. त्यामुळे येथे शेतकऱ्यांचा वावर कायम असतो. अशा धोकादायक मगरींबाबात वनविभागास कल्पना देऊनही याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे आमच्या जीवास धोका निर्माण झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. 

शेतकरी मधुसुदन परब हे आपल्या शेतात फेरफटका मारताना दुर्गंधी येत असल्याने पुढे जाऊन पाहिले असता, महाकाय मगर मृतावस्थेत तरंगताना दिसली. याची खबर त्यांनी ग्रामस्थांना दिल्यानंतर वनविभाग व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. नदीतील पाण्याचा प्रवाह तेरेखोल नदीला मिळत असल्याने परिसरात मगरींचा उपद्रव मोठा असल्याचे शेतकरी नारायण परब यांनी सांगितले. मगरींनी शेतकऱ्यांसह त्यांच्या पाळीव प्राण्यांवर अनेक हल्ले करून मोठ्याप्रमाणात नुकसान केले असताना झोपी गेलेल्या प्रशासनाने अशा मगरींचा तात्काळ बंदोबस्त करावा, असे परब यांनी सांगितले. 

मोरकेवाडी येथे मृतावस्थेत मगर असल्याची खबर मिळताच सावंतवाडी वनपाल गजानन पाणपट्टे, आजगाव वनपाल सी. व्ही. धुरी, वनरक्षक आप्पासो राठोड, श्री. पडते यांनी घटनास्थळी धाव घेत मृत मगरीला पंचनामा करून दहन केले. 

"मगर पार्क'चे काय झाले ? 

मडुरा पंचक्रोशीत गव्यांचा उपद्रव वाढत असताना मगरींची दहशत मात्र कायम आहे. गत दहा वर्षात मगरींनी अनेक शेतकरी तसेच पाळीव जनावरांवर हल्ले करून नुकसान केल्याच्या घटना आहेत. माजीमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी इन्सुलीत मगर पार्क' करणार असल्याचे सांगितले होते. त्या ठिकाणी परिसरातील मगरींना पकडून नेण्यात येणार होते. परंतु 'मगर पार्क' बारगळल्याने नदीपात्रातील मगरींचा प्रश्न कायम राहिला आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com