esakal | दाभोळ : समुद्रकिनाऱ्यावर ऑईल टार बॉल वाहत आल्याने किनारा काळवंडला
sakal

बोलून बातमी शोधा

beach

दाभोळ : समुद्रकिनाऱ्यावर ऑईल टार बॉल वाहत आल्याने किनारा काळवंडला

sakal_logo
By
चंद्रशेखर जोशी

दाभोळ : आज दुपारी भरतीच्या वेळी आंजर्ले येथील समुद्रकिनाऱ्यावर ऑईल टार बॉल (ऑईलच्या गुठळ्या ) लाटांबरोबर वहात आल्या असल्याने हा किनारा काळवंडला असून किनाऱ्यावरील वाळूतून चालणे आता कठीण झाले असून सागरी प्रदूषणाचा प्रश्नही निर्माण झाला आहे.

आंजर्ले गावाला विस्तीर्ण असा सुमारे दोन किलोमिटर लांबीचा नितांत सुंदर आणि स्वच्छ असा समुद्रकिनारा लाभला असल्याने आंजर्ले येथे मोठ्या प्रमाणात पर्यटकांची वर्दळ असते, तसेच दरवर्षी या समुद्रकिनारी ऑलिव्ह रिडले जातीची कासवे अंडी घालण्यासाठी येत असतात, ही अंडी सुरक्षित ठेवण्यासाठी स्थानिक कासवमित्र या अंड्यांची घरटी तयार करतात, या अंड्यांमधून बाहेर आलेली कासवांची पिल्ले सुरक्षितरित्या समुद्रात सोडण्यात येतात.

हेही वाचा: नारायण राणेंच्या पत्नी, मुलाविरोधात लुकआऊट सर्क्युलर जाहीर

कासवांच्या पिल्लांना समुद्रात सोडताना हे दृश्य पहाण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने आंजर्ले येथे येतात, यासाठी कासव महोत्सवाचे आयोजनही केले जाते. मात्र समुद्रकिनारा प्रदूषित झालेला असल्यास समुद्री कासवे किनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी येत नाहीत.

आज या किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात समुद्राच्या लाटांबरोबर ऑइलच्या गुठळ्या वाहत आल्या असून किनाऱ्याच्या बहुतांश भाग या गुठळ्यानी व्यापला आहे, समुद्रातून जाणाऱ्या एखाद्या जहाजातून ऑईलची गळती झाल्यामुळे अथवा वापरलेले ऑइल समुद्रात सोडले गेले असल्यामुळे हा प्रकार घडलेला असावा असे मत आंजर्लेचे रहिवासी मकरंद म्हादलेकर यांनी व्यक्त केले आहे.

हेही वाचा: बाजार समित्यांत उभारणार सौर प्रकल्प

समुद्रकिनारी ऑईल टार बॉल चा थर जमा झाल्याने किनाऱ्यावरून चालणे मुश्किल झाले आहे, या ऑइल टार बॉलचा उग्र वास असून कपडयाना जर ते लागले तर ते निघत नाही. दरवर्षी आंजर्ले व मुर्डी गावातील गणेशमूर्तींचे विसर्जन आंजर्ले येथील समुद्रातील पाण्यात केले जात असून यावर्षी किनाऱ्यावर आलेल्या ऑईलच्या गुठळ्यांमुळे गणेशमूर्तींचे विसर्जन करायला किनाऱ्यावर कसे जायचे हा प्रश्न भाविकांना पडला आहे.

किनाऱ्यावर पसरलेल्या या ऑईलच्या गुठळ्यांमुळे प्रदूषणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यासंदर्भात दापोलीच्या तहसीलदार वैशाली पाटील यांना माहिती दिली असता त्यांनी महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना याची माहिती देते असे सांगितले.

loading image
go to top