बंधारे बांधणी राहिली कागदावरच

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 जानेवारी 2017

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद प्रशासनाने यावर्षी निश्‍चित केलेले लोकसहभागातून कच्चे व वनराई बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे व लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे कागदावरच राहिले आहे. जिल्हा परिषद प्रशासनाच्या 7500 बंधाऱ्यांच्या पैकी आतापर्यंत केवळ 1801 एवढेच (24 टक्के) बंधारे बांधून पूर्ण झाले आहेत. याबात जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांनी संबंधितांना असमाधानकारक कार्यपद्धतीबाबत नोटीस बजावत संबंधीत विभागांची 23 जानेवारीला तातडीची बैठक बोलावली आहे.

जिल्ह्यात दरवर्षी समाधानकारक पाऊस पडत असतानाही उन्हाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. यावर मात करण्यासाठी व येथील पाण्याची पातळीत वाढ व्हावी यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने जिल्ह्यात 7500 कच्चे व वनराई बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्यातील प्रत्येक तालुकानिहाय उद्दिष्ट निश्‍चित करतानाच राज्य शासनाच्या जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी व सामाजिक वनीकरण विभागानाही बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट निश्‍चित करुन दिले होते; मात्र जानेवारी 2017 संपत आला तरी 7500 पैकी केवळ 1801 (24 टक्के) बंधारे बांधून पूर्ण झाले आहेत. यावर्षी जिल्ह्यात मागील काही वर्षांच्या प्रमाणात जादा पाऊस पडला. सुमारे 4000 मिलीमीटर एवढा पाऊस झाला. तरीही डिसेंबरअखेर जिल्ह्यातील अनेक नदी-नाले गोठून गेले आहेत. पाण्याचा प्रवाह बंद झाला आहे. मागील दोन वर्षे जिल्हा प्रशासनाने निश्‍चित केलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न करत डिसेंबरअखेर सुमारे 5000 एवढे बंदारे पूर्ण करण्यात यश मिळविले होते. यामुळे गतवर्षीपासून पाऊस कमी पडूनही पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यास मदत झाली होती; मात्र यावर्षी गेल्या दोन वर्षातील राबविण्यात आलेली बंधारे बांधण्याची चळवळ यावर्षी दिसून आली नाही. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांनीही असमाधान व्यक्त करत संबंधीत विभागांना धीम्या कामकाजाबाबत नोटीस बजावत 23 जानेवारीला संबंधीत अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली आहे.
 

बंधारे पूर्ततेचा अहवाल
तालुके- उद्दिष्ट- कच्चे- वनराई- पूर्तता- टक्केवारी
कणकवली- 1000- 141- 37- 178- 17.80
कुडाळ- 1000- 235- 170- 405- 40.50
दोडामार्ग- 400- 8- 9- 17- 4.25
वेंगुर्ला- 500- 60- 132- 192- 38.40
मालवण- 1000- 82- 66- 148- 14.80
देवगड- 900- 150- 206- 356- 39.56
सावंतवाडी- 1000- 143- 93- 236- 23.60
वैभववाडी- 400- 188- 75- 263- 65.75
सामाजिक वनीकरण- 200- 65- 0- 6- 3.00
जिल्हा अधीक्षक कृषी- 1100- 0- 0- 0- 0.00
एकूण- 7500- 1013- 788- 1801- 24.01

अधिक्षक कृषीचा "भोपळा'
जिल्हा परिषद प्रशासनाने निश्‍चित केलेल्या एकूण 7500 कच्चे व वनराई बंधारे बांधण्याच्या पैकी 1100 बपंधारे बांधण्याचे उद्दिष्ट जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाला देण्यात आले होते; मात्र या विभागाने बंधारे बांधण्यासाठी कोणतेही प्रयत्न केलेले नाहीत. जिल्ह्यातील कृषी क्षेत्रात उन्नती साधण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करुन विविध योजना राबविणाऱ्या या विभागाकडून कृषी क्षेत्रासठी आवश्‍यक महत्वाच्या पाण्याचा साठा करण्यासाठी उपयुक्त ठरणारे बंधारे बांधण्याकडे मात्र या विभागाने दुर्लक्ष केले आहे. या विभागाने यावर्षी जानेवारी संपत आला तरी उद्दिष्टाचा भोपळाच फोडलेला नाही.

पाणीटंचाई अटळ
जिल्ह्यातच पावसाचे प्रमाण अधिक असूनही पाण्याचे योग्य नियोजन करण्याबाबत ठोस उपाययोजना होत नसल्याने व वाहून जाणारे पाणी अडविण्याबाबत काटेकोर उपाययोजना केल्या जात नसल्याने दरवर्षी पाणीटंचाईसारख्या गंभीर समस्येला सामोरे जावे लागते. दरवर्षी संभाव्य पाणीटंचाईचे कोट्यवधीचे आराखडे बनविले जातात. गेली दोन वर्षे बंधारे बांधण्याचे काम समाधानकारक झाल्याने काही प्रमाणात पाणीटंचाईची झळ कमी करण्यात यश मिळाले; मात्र यावर्षी 25 टक्केही बंधाऱ्यांची कामे झाली नसल्याने व आता यापुढे केवळ उद्दिष्टपूर्ततेसाठी बंधारे बांधण्यात आले तरी त्यामध्ये मुबलक पाणीसाठा तयार नसल्याने यावर्षी पाणीटंचाई अटळ आहे तर ती अधिक दाहक होण्याची शक्‍यता दिसत आहे.

Web Title: dam building remains on paper