चिमुकल्यांच्या वाट्याला धोकादायक प्रवास

प्रभाकर धुरी
बुधवार, 12 एप्रिल 2017

दोडामार्ग - जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी आयी-किटवाडी शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यातील ओहोळावर पूल बांधून देण्याचा शब्द न पाळल्याने, पुन्हा या वर्षीही चिमुकल्या शाळकरी मुलांना ओहोळ ओलांडताना पावलापावलावर मृत्यूची भीती सतावणार आहे. प्रशासकीय अधिकारी आणि राजकीय पदाधिकारी इतके निगरगट्ट आणि संवेदनहीन झालेत का, की त्यांना त्या चिमुकल्या जीवांची जराही पर्वा नसावी, असा प्रश्‍न चिमुकल्यांची जीवावर बेतणारी कसरत पाहिली की पडल्यावाचून राहत नाही.

दोडामार्ग - जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी आयी-किटवाडी शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यातील ओहोळावर पूल बांधून देण्याचा शब्द न पाळल्याने, पुन्हा या वर्षीही चिमुकल्या शाळकरी मुलांना ओहोळ ओलांडताना पावलापावलावर मृत्यूची भीती सतावणार आहे. प्रशासकीय अधिकारी आणि राजकीय पदाधिकारी इतके निगरगट्ट आणि संवेदनहीन झालेत का, की त्यांना त्या चिमुकल्या जीवांची जराही पर्वा नसावी, असा प्रश्‍न चिमुकल्यांची जीवावर बेतणारी कसरत पाहिली की पडल्यावाचून राहत नाही.

किटवाडी ही आयीची मोठी वाडी. त्या वाडीवरील मुलांसाठी चौथीपर्यंत शाळा आहे; शिवाय अंगणवाडीही आहे. चौथीपर्यंत सुमारे ३५ मुले शिकताहेत. अंगणवाडीत सुमारे पंधरा. एवढी पटसंख्या असूनही पावसाळ्यात शाळेत जाण्यासाठी मुले व पालकांना जीवघेणी कसरत करावी लागते. ओहोळावर पूल नाही. रस्त्याचे व पुलाचे काम अर्धवट आहे. पूल एकीकडे तर पाणी दुसरीकडून वाहते अशी स्थिती आहे. किटवाडीवासीयांनी पुलासाठी बेमुदत उपोषण केले. काँग्रेस पदाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे तत्कालीन उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, बांधकाम सभापती दिलीप रावराणे व समाजकल्याण सभापती अंकुश जाधव त्यावेळी ग्रामस्थांना भेटले. श्री. जाधव यांनी तर इतरांसारखी आम्ही आश्‍वासने देत नाही, आम्ही शब्द पाळतो व कामे करतो, असे बैठकीत सांगितले. प्रत्यक्षात मात्र वर्षभरानंतरही परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. जिल्हा परिषदेच्या बांधकाम अभियंत्याला सभेत सूचना दिल्या गेल्या, पूलवजा साकव बांधण्यासाठी निधीची घोषणा झाली.

उपोषण थांबविण्यासाठी काही पाइप व खडी टाकण्यात आली. उपोषण संपते आणि त्यांच्या कामाची लगबगही. त्या ओहोळात पाइप तसेच पडून आहेत. खडीही तशीच आहे. जिल्हा परिषद काँग्रेसचीच आहे. पंचायत समिती सदस्य आणि जिल्हा परिषद सदस्यही पूर्वीप्रमाणे भाजपचेच आहेत; पण विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतणारी परिस्थिती बदलायला हवी होती, ती मात्र बदललेली नाही. तीही तशीच आहे.

पूल किंवा साकव नसल्याने मुलांना पाइपवरून चढून- उतरून प्रवास करावा लागतो. स्वतःच्या उंचीएवढ्या पाइपवर चढायचे आणि उतरायचे अग्निदिव्य मुलांना पार करावे लागायचे ते या वर्षीही करावे लागणार आहे. शाळेचे शिक्षक, अंगणवाडीच्या शिक्षकांना मुलांना उचलून घेऊन इकडून तिकडे सोडावे लागणार आहे. सत्ता कोणाचीही येवो, जोपर्यंत शासकीय अधिकारी आणि पदाधिकारी मुलांच्या भविष्याचा विचार करून प्रश्‍न सोडविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करत नाहीत, तोपर्यंत अनेक गावांतील असंख्य कळ्यांना उमलण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे.

‘नेमेचि येतो पावसाळा’
‘नेमेचि येतो पावसाळा’ असे म्हणतात; पण किटवाडीत नित्यनेमाने बरसणारा पाऊस चिमुकल्या शाळकरी मुलांच्या व पालकांच्या हृदयात धडकी भरवणारा असतो. ये रे ये रे पावसा, तुला देतो पैसा किंवा रेन रेन कम अगेन ही बडबडगीते अन्य शाळांतील मुले अगदी आनंदाने म्हणत असली तरी किटवाडीतील मुलांना ती बडबडगीते म्हणूच नये, अशी वाटले तर आश्‍चर्य वाटू नये. उलट त्यामागची त्यांची भावना समजून घेणे गरजेचे आहे.

Web Title: Dangerous journeys children