दापोलीत लालपरी आतबट्यात : खर्च 21 हजार तर उत्पन्न 2 हजार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मे 2020

आज सुटलेल्या एसटी बसेसचा व्यवसाय आतबट्याचा ठरला.

 दापोली  (रत्नागिरी)  : येथून आज सुटलेल्या एसटी बसेसचा व्यवसाय आतबट्याचा ठरला. डिझेलचा खर्च 21 हजार तर तिकीट विक्रीतून मिळाले फक्त 2 हजार रुपये. यामुळे हा तोट्याचा धंदा किती दिवस चालणार याची चर्चा आज सुरू होती.

 दोन महिन्यानंतर कालपासून एसटीची सेवा सुरू झाली असून काल एसटी प्रशासनाच्या समन्वयाअभावी  दापोली बस स्थानकातून एकही बस सुटली नाही.  आज दापोली बसस्थानकातून सकाळी रत्नागिरी बस सुटली. रत्नागिरी येथे जाण्यासाठी प्रवासी संख्या कमी असल्याने तिकीट विक्रीतून केवळ 750 रुपये मिळाले तर रत्नागिरी दापोली प्रवासात केवळ 150 रुपयांचा तिकीट विक्रीतून व्यवसाय झाला. दापोली चिपळूण ही बस प्रवासी नसल्याने खेड पर्यंत जाऊन परत आली तर दापोली खेड व दापोली मंडणगड प्रवासात मोजकेच प्रवासी होते.  

आज दिवसभरात एसटीला तिकीट विक्रीतून केवळ सुमारे 2 हजार रुपये मिळाले तर डिझेलसाठी 21 हजार रुपये खर्च आला आहे.  एसटी चालक व वाहक तसेच आज बसस्थानकात   कार्यरत असलेले अधिकारी व कर्मचारी यांच्या वेतनाचा खर्च अधिक आहे, त्यामुळे एसटीने सुरू केलेल्या या सेवेचा आर्थिक भार एसटी किती दिवस सहन करणार याचीच चर्चा आज बसस्थानक परिसरात सुरू होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dapoli bus division loss in passenger services