हॉटेल व्यावसायिकांना मोठा दिलासा, हॉटेल व्यवसाय सुरू करण्यासाठी करणार प्रयत्न : उदय सामंत

राजेश शेळके
शुक्रवार, 10 जुलै 2020

रत्नागिरी जिल्ह्यातील हॉटेल व्यावसायिकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उदय सामंत यांनी आज संवाद साधला

रत्नागिरी : लॉकडाऊचा सर्वांत मोठा फटका हॉटेल व्यवसायाला बसला आहे. या व्यवसायावर अनेकांचा चरितार्थ अवलंबून आहे. सोशल डिस्टन्स व आवश्यक खबरदारी बाळगून हॉटेल व्यवसाय सुरू करावा, या मागणीसाठी मी आजच उच्च सचिवांशी बोलणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली. सामंत यांच्या पुढाकाराने हॉटेल व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील हॉटेल व्यावसायिकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उदय सामंत यांनी आज संवाद साधला. या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड, अतिरिक्त पोलिस अधीक्षक विशाल गायकवाड, जिल्हा हॉटेल संघटनेचे अध्यक्ष रमेश कीर, हॉटेल व्यावसायिक मृत्युंजय खातू, अभिमन्यू वणजु, अभिजित खाडिलकर, अभय जोग आदी उपस्थित होते. जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात हॉटेल व्यावसायिक आहेत.

हेही वाचा - 160 कामगार आले रस्त्यावर ; शंभर टक्के पगाराची मागणी, पण कंपनी देेते एवढेच.... -

या व्यावसायातून वर्षाला कोट्यवधीची उलाढाल होते. जिल्ह्याच्या पर्यटनाला चालना मिळते. मात्र कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे हा व्यवसाय पुरता बसला आहे. हे व्यावसायिक मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. कोरोनाच्या या गंभीर परिस्थितीत देखील जिल्ह्यातील व्यावसायिकांकडे लक्ष ठेवल्याबद्दल रमेश कीर यांनी उदय सामंत यांचे विशेष कौतुक केले.

हेही वाचा - मुंबई – गोवा महामार्गावरुन जाणारी बस संगमेश्वरात येताच जळून खाक : सुदैवाने सर्व प्रवासी सुखरुप -

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारा बैठक​

यावेळी आपल्या मागण्या मांडताना रमेश कीर म्हणाले, शासनाने टुरिझमला अजूनही म्हणावा तसा दिलासा दिला नाही. किमान रेस्टॉरंटला तरी उघडण्यास परवानगी मिळणे गरजेचे आहे. तसेच पालिकेने लॉकडाऊन काळातील कराची आकारणी वाणिज्य दराने न करता रहिवासी दराने करावी. यावर सकारात्मक निर्णय घेण्याच्या सूचना उदय सामंत यांनी प्रशासनाला दिल्या. हॉटेल व्यावसायिकांना सवलती मिळण्यासाठीचा प्रस्ताव त्यांनी आजच तयार करून तो मला पाठवावा. याबाबत मी तातडीने उच्च सचिवांशी बोलून आवश्यक खबरदारी घेऊन हॉटेल व्यवसाय सुरू करावा, यासाठी मी स्वतः ही आग्रही आहे, असे मत उदय सामंत यांनी या बैठकीत मांडले. सामंत यांनी पुढाकार घेतल्याने हॉटेल व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

संपादन - अर्चना बनगे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: day samant hoteliers in Ratnagiri district Meeting by video conferencing