मांगेलीतील पर्यटनाला आता पावसाची प्रतीक्षा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 जून 2017

धबधबा रोडावला - सुटीच्या दिवशी होतेय गर्दी; अतिउत्साही पर्यटकांना आवर घालावा

दोडामार्ग - वर्षा पर्यटनासाठी मांगेली सज्ज झाली असली तरी पावसाने दडी मारल्याने धबधबा रोडावत वाहू लागला आहे. तो पूर्ण क्षमतेने वाहण्यासाठी आणि पर्यटक येण्यासाठी मांगेलीवासीयांना पावसाची प्रतीक्षा आहे.

धबधबा रोडावला - सुटीच्या दिवशी होतेय गर्दी; अतिउत्साही पर्यटकांना आवर घालावा

दोडामार्ग - वर्षा पर्यटनासाठी मांगेली सज्ज झाली असली तरी पावसाने दडी मारल्याने धबधबा रोडावत वाहू लागला आहे. तो पूर्ण क्षमतेने वाहण्यासाठी आणि पर्यटक येण्यासाठी मांगेलीवासीयांना पावसाची प्रतीक्षा आहे.

पावसाळ्यात मांगेलीचे सौंदर्य अधिक खुलते. हिरवेकंच डोंगर धुके लपेटून घेतात. ढगांचा प्रवास पश्‍चिमेकडूून पूर्वेकडे सुरू असतो. फणसवाडीतील डोंगरकड्यांवरून पांढरेशुभ्र प्रपात फेसाळत कोसळत असतात. मांगेली-फणसवाडीतील पूर्ण क्षमतेने वाहणारा धबधबा देशी-विदेशी पर्यटकांचे खास आकर्षण असते. शनिवार आणि रविवार पर्यटकांनी मांगेली फुलून जाते.
यंदा मात्र अद्याप पूर्ण क्षमतेने धबधबा वाहण्यास सुरवात झालेली नाही. गेल्या दोन दिवसांत पडलेल्या पावसाने धबधबा वाहण्यास सुरवात झाली असली तरी पूर्ण क्षमतेने धबधबा प्रवाहित होण्यासाठी धुवाँधार पावसाची गरज आहे. 

पर्यटकांची संख्या बऱ्यापैकी असल्याने स्थानिकांनी धबधबा परिसरात छोट्या-छोट्या झोपड्या उभारल्या आहेत. त्यातून पर्यटकांसाठी चहा, भजी, वडापाव, मिरची पाव, अंडा आम्लेट, रस आम्लेट, चिकन पाव, चिकन चपाती आणि चायनीज खाद्य पदार्थही उपलब्ध करून दिले जातात. दोन दिवस पावसाने दमदार हजेरी लावल्याने शनिवार-रविवार पर्यटकांनी फुलून जाईल अशी अपेक्षा मांगेलीवासीयांना आहे. व्यापाऱ्यांनी दुकाने सुरू केली आहेत. पण शनिवारी पावसाने दडी मारल्याने दुपारपर्यंत पर्यटक मांगेलीत पोचले नव्हते. पर्यटकांची संख्या किरकोळ आहे. ती वाढण्यासाठी धो-धो पाऊस आणि धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित होण्याची गरज आहे.

वर्षा पर्यटन पावसाळा संपेपर्यंत चालणार आहे. फणसवाडीतून तळेवाडीत माध्यमिक शाळेत शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थिनी चालत सायंकाळी घरी येतात. मद्यपी पर्यटकांकडून त्यांना त्रास दिला जातो. त्यामुळे वर्षा पर्यटन काळात धबधबा परिसरात पोलिस तैनात करण्याची मागणी होत आहे.

वर्षा पर्यटनासाठी मांगेली सज्ज झाली असली तरी बांधकाम विभागाला मात्र अद्याप जाग आलेली नाही. मांगेलीतील रस्त्यात गेल्या पावसाळ्यात पडलेले खड्डे अद्याप बुजविण्यात आलेले नाहीत. रस्त्याच्या बाजूपट्टीवर अनेक ठिकाणी वाढलेल्या झाडीमुळे समोरून येणारे वाहन दिसत नाही.

बहुतेक पर्यटक नव्याने येणारे, काही मद्याच्या नशेत वाहन चालविणारे असू शकतात. साहजिकच अपघाताचा धोका नक्की आहे. बांधकामने त्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज आहे. विकेन्ड मजेत घालविण्यासाठी येणारे पर्यटक आणि पर्यटकांच्या जीवावर पर्यटन उद्योग उभारणारे स्थानिक ग्रामस्थ वर्षा पर्यटनातून सुखद अनुभव घेतील, याची खबरदारी पोलिस आणि बांधकाम विभागाने घेण्याची गरज आहे.

दरडीपासून सावधान...
ज्या कड्यावरून धबधबा कोसळतो, त्या कड्याचा काही भाग गुरुवारी (ता. १५) कोसळला. त्या वेळी खाली कुणी पर्यटक नसल्याने अपघात टळला. त्यामुळे वर्षा पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांनी कड्याजवळ आंघोळीसाठी जाऊ नये, असा इशारा स्थानिकांनी दिला आहे.

Web Title: ddodamarg konkan mangoli tourism rain waiting