मृत माकड सापडल्याने डिंगणे भागात खळबळ; तिसरी घटना

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 फेब्रुवारी 2019

डिंगणे गावातील आरोग्यसेवक पद रिक्त आहे. मृत माकडाच्या पार्श्‍वभूमीवर लवकरात लवकर आरोग्य सेवकाची नेमणूक करावी.
- जयेश सावंत, सरपंच

बांदा - डिंगणे सरपंच जयेश सावंत यांच्या काजू बागायतीत आज सकाळी मृत माकड सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. माकडतापाच्या पार्श्‍वभूमीवर व ऐन काजू हंगामात गेल्या महिनाभराच्या कालावधीत तिसरे मृत माकड सापडल्याने डिंगणे गावात भीतीचे वातावरण आहे. 

गतवर्षी माकडतापाने डिंगणे, डोंगरपाल परिसरात हाहाकार माजविला होता, तर दोन दिवसांपूर्वीच भालावल येथील महिलेचा माकडतापाने मृत्यू झाल्याची घटना घडली होती. सध्या काजू हंगाम सुरू झाल्याने सकाळी जयेश सावंत हे आपल्या काजू बागायतीत गेले होते. त्यावेळी त्यांना आपल्या बागेत माकड मृतावस्थेत आढळले. त्यांनी याची माहिती ग्रामस्थांना दिली. याठिकाणी ग्रामस्थांनी धाव घेत लागलीच खबरदारीचा उपाय म्हणून मृत माकडाला दहन केले.

गेली तीन वर्षे बांदा परिसरातील सटमटवाडी, डिंगणे, गाळेल, डोंगरपाल येथे माकडतापाने थैमान घातले होते. या तापाने परिसरात २० हून अधिक जणांचे बळी घेतले आहेत. काजू हंगामातच या तापाचे प्रमाण वाढत असल्याने शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण आहे. या वर्षी महिनाभराच्या कालावधीत डिंगणे येथे तिसऱ्यांदा मृत माकड आढळल्याने वनखात्याने या परिसराचे सर्वेक्षण करावे, अशी मागणी जयेश सावंत यांनी केली आहे.

डिंगणे गावातील आरोग्यसेवक पद रिक्त आहे. मृत माकडाच्या पार्श्‍वभूमीवर लवकरात लवकर आरोग्य सेवकाची नेमणूक करावी.
-जयेश सावंत,
सरपंच

Web Title: dead monkey found in Dingane