माजगावात माकडांच्या मृत्यूचे सत्र 

Dead Monkey Found In Majgaon Sindhudurg Marathi News
Dead Monkey Found In Majgaon Sindhudurg Marathi News

सावंतवाडी ( सिंधुदुर्ग )  - तालुक्‍यातील बांदा येथील माकडतापाचे थैमान अजूनही ताजे असतानाच माजगाव म्हालटकरवाडा परिसरात गेल्या महिन्याभरात पाच मृत माकडे आढळली आहेत. यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. खबरदारी म्हणुन वनविभागाने याकडे गांर्भीयाने लक्ष देऊन माकडाच्या मृत्यूबाबत नेमकी कारणे शोधावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. 

माजगाव म्हालटकरवाडा येथे मोठ्या प्रमाणात जंगलमय भाग आहे. याठिकाणी वायंगणी शेतीबरोबर रब्बीपिके घेतली जातात. या परिसरातील जंगल भागात माकडांचा वावर असतो. या महिन्याच्या सुरवातीलाच येथे मृत माकड आढळून आला. ग्रामस्थांनी वनविभागाला माहिती दिल्यानंतर या माकडाची विल्हेवाट लावली. त्यानंतर टप्प्याटप्याने पाच मृत माकडे या परिसरात आढळून आली. त्यामुळे तेथील नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. 

बांदा पंचक्रोशीत दोन वर्षापुर्वी माकडतापाने थैमान घातले होते. यात काहींना आपले जीवही गमवावे लागले होते. अजूनही माकडतापाचे संकट म्हणावे तसे गेले नाही. त्यामुळे माजगावमध्ये आढळून आलेल्या या मृत माकडांमुळे तेथील ग्रामस्थांच्या मनात भीतीने घर तयार केले आहे. याच पार्श्‍वभुमीवर आरोग्य विभागाकडून परिसरातील ग्रामस्थांना डीएमपी ऑईलचे वाटपही केले आहे. 

याबाबत या भागाचे वनपाल प्रमोद सावंत यांना विचारले असता ते म्हणाले, "" पाचही माकडांचा मृत्यू हा ठराविक कालांतराने झाला आहे; मात्र मृत्यू अद्याप नेमका कोणत्या कारणामुळे झाला या ठोस निकषापर्यंत पोहचलो नाही. प्राथमिक तपासात या माकडांच्या ग्रुपमध्ये होणाऱ्या भांडणातून जखमी होऊन ही माकडे काही दिवसांनी नैसर्गिकरित्या मरण पावतात. त्यामुळे या माकडांच्या बाबतीतही तसे झाले असावे अथवा विष प्रयोगातूनही त्यांचा मृत्यू होऊ शकतो. या भागात विद्युत लाईन जमिनीपासून जवळ असल्याने विजेच्या धक्‍क्‍याने जखमी होऊनही या माकडाचा मृत्यू होऊ शकतो.'' 

ते म्हणाले, ""असे असले तरी मृत माकडांपैकी कोणतेही माकड जखमी न सापडल्याने त्यांच्या मृत्यूबाबत संशय आहे. आतापर्यंत पाचही माकडांचे पंचनामे केले आहेत. या भागात यापुढे मृत माकड आढळुन आल्यास वनविभाग गांभिर्याने लक्ष देऊन या मागचे कारण शोधण्यासाठी शवविच्छेदन सारखी प्रक्रीया राबवणार आहे. सद्या कुठल्याही कारणाने ग्रामस्थांनी घाबरू नये.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com