रत्नागिरीतील शेतजमिनीत 'या' घटकांचे घटले प्रमाण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 जानेवारी 2020

जमिनीची होणारी धूप लक्षात घेऊन शासनाने जमिनीची आरोग्य पत्रिका हा पथदर्शी प्रकल्प राबविला. या प्रकल्पांतर्गत प्रत्येक तालुक्‍यातील एका गावाची निवड केली होती.

रत्नागिरी - रासायनिक खताच्या अतिवापरामुळे शेतजमिनीवर परिणाम होत आहे. जिल्हा कृषी अधीक्षक विभागाकडून यंदा प्रायोगिक तत्त्वावर मृद आरोग्य पत्रिका अभियान जिल्ह्यात राबविले होते. त्या अंतर्गत प्रत्येक तालुक्‍यातील एक मॉडेल गाव निवडून केलेल्या माती परीक्षणात नत्र, स्फुरद आणि झिंक, बोरॉनचे प्रमाण कमी झाल्याचे आढळले आहे. 

जमिनीची होणारी धूप लक्षात घेऊन शासनाने जमिनीची आरोग्य पत्रिका हा पथदर्शी प्रकल्प राबविला. या प्रकल्पांतर्गत प्रत्येक तालुक्‍यातील एका गावाची निवड केली होती. सर्वाधिक शेती करण्यात येत असलेल्या गावांचा त्यामध्ये समावेश होता. तेथील मातीचे 4 हजार 30 नमुने गोळा करुन त्याचे परीक्षण रत्नागिरीतील प्रयोगशाळेत करण्यात आले. त्यात जस्त, नत्र आणि स्फुरदचे प्रमाण कमी असल्याचे आढळून आले. या शेतजमिनींमध्ये घेतल्या जाणाऱ्या पिकाच्या वाढीसाठी बारा अन्नद्रव्ये आवश्‍यक असतात. त्यात सामु, क्षारता, सेंद्रीय कर्ब, स्फुरद, पालाश, नायट्रोजन, तांबे, बोरॉन आदींचा समावेश आहे. मृद आरोग्य पत्रिका अभियानात माती नमुन्यांची तपासणी होते. तयार केलेली मृद प्रमाणपत्र संबंधित शेतकऱ्यांनाही दिले आहे. त्याचा आधार घेऊन शेतीमध्ये आवश्‍यक बदल त्या-त्या वेळी शेतकऱ्यांनी करावयाचे असतात. 

हेही वाचा - निष्ठावंत असल्यानेच चिपळूण काँग्रेस शहराध्यक्षपदी यांना संधी 

मशागतीच्या चुकीच्या पद्धतीमुळे जमिनीची धूप 

पावसामुळे दरवर्षी एक हेक्‍टर जमिनीतील 10 ते 11 टन माती वाहून जाते. एक इंच माती तयार होण्यासाठी पाचशे वर्षे लागतात. कोकणातील मातीची झीज होत आहे. त्याबरोबर मातीतील घटकही कमी होत आहेत. पिकाच्या मुळांच्या वाढीसाठी प्रामुख्याने सुक्ष्म मूलद्रव्याचे प्रमाण पाच पर मिलियम इतके असणे आवश्‍यक आहे. हेच प्रमाण कमी असल्याने मुळांची वाढ होत नाही. त्यामुळे पिकाच्या वाढीवर त्याचा परिणाम होतो. जस्ताचे प्रमाण कमी असल्याने पिकाला पक्वता येत नाही, याचा परिणाम पिकाच्या उत्पादनावर होत आहे. शेत मशागतीच्या चुकीच्या पद्धती, बेसुमार जंगलतोड आदी कारणांमुळे जमिनीची धूप होते. 

हेही वाचा - उदय सामंत म्हणाले, कणकवलीबाबत आमचं ठरलंय 

सेंद्रीय, गांडूळ खताचा वापर गरजेचा 

स्फुरदचे प्रमाण 15 ते 25 किलोग्रॅम प्रतिहेक्‍टर आवश्‍यक असते; नत्र 280 किलोग्रॅम प्रतिहेक्‍टर असणे आवश्‍यक आहे. त्याचेही प्रमाण कमी आहे. ते वाढविण्यासाठी सेंद्रीय खत, गांडूळ खताचा वापर करावा. 
- एस. सी. धाडवे, जिल्हा मृद सर्व्हेक्षण व मृद चाचणी अधिकारी. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Decrease In Proportion Of Different Components In Soil Ratnagiri Marathi News